#UnclogHinjawadiITPark Movement : देवाभाऊ, अजितदादांनंतर आता चंद्रकांतदादांकडून अपेक्षा!
हिंजवडी आयटी पार्कमधील प्रलंबित प्रश्नांवर निवेदन : आयटी कर्मचाऱ्यांच्या रोषाची घेतली दखल

पिंपरी–चिंचवड | हिंजवडी आयटी पार्क परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या मिटाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या #UnclogHinjawadiITPark मोहिमेच्या प्रतिनिधींनी शनिवारी राज्याचे मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी आयटी कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत आठवे निवेदन मंत्रीमहोदयांना सादर करण्यात आले.
याआधी या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र अद्याप काही ठोस बदल दिसत नसल्याने आयटी कर्मचाऱ्यांची नाराजी वाढली आहे. त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष चंद्रकांतदादांकडे लागले असून, “देवाभाउ अजितदादांनंतर आता चंद्रकांतदादांकडूनच अपेक्षा” असा सूर स्थानिक आयटी कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : पुण्यात आणखी १५०० कोटींचा जमीन गैरव्यवहार? एकनाथ खडसेंचा मोठा दावा
ही भेट पिंपरी–चिंचवडचे नगरसेवक ममताताई विनायक गायकवाड व संदीपअण्णा कस्पटे यांच्या निमंत्रणानुसार ‘स्नेहीभेट’ कार्यक्रमात घेण्यात आली. या वेळी #UnclogHinjawadiITPark मोहिमेचे सचिन गुणले, सचिन लोंढे, श्रीमती तेजस्विनी सवाई व राज मंगरुळे उपस्थित होते. बैठकीत हिंजवडीतील रस्त्यांची दुरुस्ती, वाहतुकीची कोंडी, तसेच वाकड येथील प्राधिकरणाच्या खेळाच्या मैदानाचे पालिकेत वर्गीकरण व वाकड दत्तमंदिर रस्त्यावरील प्रलंबित कामे या तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या सर्व विषयांवर गांभीर्याने लक्ष घालून, पीएमआरडीए आयुक्तांशी चर्चा करून समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले. या वेळी आमदार शंकर जगताप, नगरसेविका ममता गायकवाड व नगरसेवक संदीप कस्पटे उपस्थित होते. निमंत्रणाबद्दल आभार मानत सचिन लोंढे यांनी पिंपरी–चिंचवड हौसिंग सोसायटी व #UnclogHinjawadiITPark Movement तर्फे मंत्रीमहोदयांचे आभार व्यक्त केले.
हिंजवडी आयटी पार्क हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. परंतु, येथे वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामे, वाहतुकीची कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आम्ही सलग आठ वेळा शासनाला निवेदन दिले असून, यावेळी मंत्री चंद्रकांतदादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता आम्ही आशावादी आहोत की, या वेळी ‘फक्त आश्वासन नव्हे तर कृती’ दिसेल.
– सचिन लोंढे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन.




