इंद्रायणीनगर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![Spontaneous response to blood donation camp at Indrayanagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-26-at-10.00.50.jpeg)
भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पुढाकार
रक्तदान शिबिरात २३१ बॅग रक्त संकलन
पिंपरी । प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण २३१ बॅग रक्त संकलन करण्यात आले.
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणीनगर येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
भारतीय जनता पार्टी, प्रदेश कार्यालयाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुमारे १२५ हून अधिक विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
याबाबत शिवराज लांडगे म्हणाले की, भाजपा पक्षश्रेष्ठींच्या सुचनेनुसार आम्ही रक्तदान शिबीर आयोजित केले होते. ‘नातं माणुसकीच, रक्ताच्या नात्या पलीकडचं’ असे ब्रिदवाक्य घेवून हे शिबीर होईल. ‘आम्ही रक्तदान करतोय तुम्हीपण करा’ असे आवाहन आम्ही नागरिकांना केले होते. कोरोना काळात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवला होता. आता कोरोनाची तिसरी लाट येणार, अशी भिती व्यक्त केली जात आहे. कोरोनासह अन्य आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना मदत व्हावी. या हेतुने आम्ही हा उपक्रम हाती घेतला होता. इंद्रायणीनगर आणि परिसरातील या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
अमराई चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य…
चला सामाजिक बांधिलकी जपूया, महाराष्ट्रासाठी रक्तदान करूया…! असा संकल्प करीत अमाराई चॅरिटेबल ट्रस्टने रक्तदान शिबिरात मोलाचे सहकार्य केले. ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. परिसरातील युवक आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.