महिलांचा मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवडमध्ये विशेष मोहिम
![Special campaign in Chinchwad to increase the percentage of women voters](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Pimpri-Chinchwad-780x470.jpg)
पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील महिला मतदारांचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महिलांना ईव्हीएमचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघामार्फत महिलांना मार्गदर्शन करण्यात येऊन महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
या उपक्रमात मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या तिन्ही विधानसभा मतदार संघानी सहभाग घेतला. कुटुंबातील महिलांच्या मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन करून महिलांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढे यावे. आपल्या परिचयातील महिलांना देखील मतदार नोंदणी करण्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी’; संजय राऊतांचा हल्लाबोल
महिलांचे लोकशाहीमध्ये मोठे स्थान आणि योगदान आहे. राज्यात स्त्री-पुरुष मतदारांचे प्रमाण ९२५ इतके आहे. महिलांचा मतदान नोंदणी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी व मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाइन अँपवर ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करता येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.