चाकणमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई: साडेतीन लाखांचा गुटखा पकडला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/gutkha-chakan.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आंबेठाण मधील पडवळ वस्ती येथे कारवाई करून साडेतीन लाखांचा गुटखा पकडला. ही कारवाई बुधवारी (दि. 8) दुपारी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र कुमाराम चौधरी (वय 28), हनुमान चौधरी, सुनील गंगणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळ वस्ती मधील तिरुमला पार्क येथे एका खोलीत हनुमान चौधरी याने गुटख्याची साठवणूक केली आहे. तो चारचाकी गाडीमधून हा गुटखा आजूबाजूच्या परिसरात विकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन लाख 50 हजार 520 रुपयांचा गुटखा, एक हजार 800 रुपये रोख रक्कम आणि एक लाख रुपये किमतीची एक चारचाकी गाडी असा एकूण चार लाख 52 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.