सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर व संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे पोलिसांच्या ताब्यात
![Social activists Maruti Bhapkar and Satish Kale of Sambhaji Brigade in police custody](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/maruti-bhapkar.jpg)
राष्ट्र गौरव पुरस्काराच्या वितरणासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे उपस्थित राहणार होते. दरम्यान, राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्तांच्या वतीने काळ्या फिती लावून राज्यपालांचा निषेध केला जाणार होता. त्या दृष्टीने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहाराध्यक्ष सतीश काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. नागरिकांची काटेकोर तपासणी यावेळी करण्यात आली. नागरिकांनी परिधान केलेले काळे मास्क उतरवून त्यांना सर्जिकल मास्क पुरविण्यात आले. मेटल डिटेक्टर मशीन जवळ नागरिकांकडून अगदी पेन देखील काढून घेण्यात आले. बराच वेळ निघून गेल्यानंतर परिसरातील पोलीस बंदोबस्त सैल करण्यात आला व नागरिकांमध्ये राज्यपालांचा दौरा रद्द झाल्याची चर्चा सुरू झाली.