भाई-दादांच्या गुंडगिरीमुळे लघुउद्योजक आर्थिक संकटात – माजी आमदार विलास लांडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/FB_IMG_1615107151119.jpg)
- पोलिसांनी कायदासुव्यवस्था पाळत ‘एमआयडीसी’तील गुंडांचा बंदोबस्त करावा
- महापालिकेत चो-यामा-या चालतात मग उद्योजकांना भाडे माफी का नको ?
- खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या परिसंवादात लांडे यांनी मांडली उद्योजकांची बाजू
पिंपरी / महाईन्यूज
‘एमएसएमई’ आणि लघुउद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त नुकसान लघुउद्योजकांचे झाले आहे. कोरोना काळात केवळ एक महिना त्यांना भाड्यामध्ये सूट देण्यात आली. खरे तर एक वर्षभराचे भाडे माफ करायला हवे. कारण, पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या चो-या होत आहेत. पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला जात आहे. देशाच्या विकासात भर घालणा-या उद्योजकांना सूट दिली तर काय बिघडणार आहे ?, अशा शब्दांत विरोधकांवर निशाना साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोर उद्योजकांची बाजू मांडली.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा परिसंवादाचा कार्यक्रम शनिवारी (दि. 6 मार्च) रोटरी क्लब हॉल, संभाजीनगर चिंचवड येथे पार पडला. यावेळी माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरीसह लगतच्या ‘एमआयडीसी’मधील लघुउद्योजकांना भेडसावणा-या समस्या मांडल्या. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, खजिनदार संजय ववले, सचिव जयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, माजी महापौर मंगला कदम आदी उपस्थित होते.
माजी आमदार लांडे म्हणाले की, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेतल्यामुळेच याठिकाणी ‘एमआयडीसी’ उभी राहिली. त्यामध्ये मोठ-मोठे उद्योग आणण्याचे काम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. पवार यांनी हिंजवडी येथे ‘आयटी’ पार्क आणलं. त्यांच्या योगदानामुळेच पुढे उद्योग क्षेत्रात भरभराट सुरू झाली. परंतु, कोरोनामुळे आर्थिक संकटातून वाटचाल करणा-या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे. ‘एमआयडीसी’मध्ये चो-यामा-या वाढल्या आहेत. रात्रीतून कंपन्या फोडल्या जात आहेत. कायदासुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ही शोकांतिका आहे. ‘एमआयडीसी’च्या मोकळ्या भूखंडावर गाळे बांधले आहेत. त्यातून महिन्याला दीड लाख, दोन लाख भाडं घेतलं जातं. ज्या कोण्या भाई-दादांच्या गुंडगिरीमुळे हे सगळं घडत आहे, ते वेळीच थांबलं पाहिजे, अशी चेतावणी देखील लांडे यांनी पोलिसांना दिली.
उद्योग मंत्र्यांसोबत चर्चा करून भोसरी, पिंपरी ‘एमआयडीसी’च्या समस्या सोडवाव्यात. पुणे-नाशिक महामार्ग विकसित झाला पाहिजे. औद्योगिक पट्ट्यात मेट्रो आली पाहिजे. यासह लघु उद्योजक संघटनेच्या ज्या मागण्या आहेत. त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोडविल्या पाहिजेत, अशा विविध मागण्या माजी आमदार लांडे यांनी खासदार कोल्हे यांच्यापुढे मांडल्या.