विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेची जोरदार मुसंडी!
प्रभाग क्रमांक २० :राजेश वाबळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला नागरिकांचा पाठिंबा

पिंपरी चिंचवड :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संत तुकाराम नगर, वल्लभनगर, महात्मा फुलेनगर, लांडेवाडी, कासारवाडी आणि नाणेकर चौक या परिसरांचा समावेश असलेल्या या प्रभागात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून जनसामान्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
शिवसेना महानगरप्रमुख राजेश चिमणराव वाबळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून मतदारांपर्यंत पोहोचत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाची लाट दिसून येत असल्याचे स्थानिक मतदारांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – इंद्रायणी नगर प्रभाग क्र.८ मध्ये भाजप उमेदवारांची प्रचारात आघाडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनहितकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा विकास करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक २० हा आदर्श प्रभाग म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केले.प्रभागातील शाश्वत विकास आणि समस्यामुक्त परिसरासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन राजेश चिमणराव वाबळे यांनी केले आहे.
हे उमेदवार मैदानात!
या प्रभागातून शिवसेनेतर्फे विनोद नामदेव वाघमारे, वैशाली राजेश वाबळे, स्वीटी निलेश मलातपुरे आणि राजेश चिमणराव वाबळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्व उमेदवारांचा सामाजिक कार्याचा अनुभव आणि जनसंपर्क दांडगा असल्याने मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेनेकडे महिला मतदारांचा कल
राज्य शासनाच्या महिलाभिमुख योजनांमुळे महिला मतदारांचा कल मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे झुकलेला दिसत आहे. प्रचारादरम्यान महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत असून उमेदवारांच्या प्रचाराला विशेष बळ मिळाले आहे. राजेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासकामांचा अनुभव आणि सातत्यपूर्ण संपर्क ही या पॅनलची प्रमुख ताकद मानली जात आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




