शिवसेना युवती सेनेच्या अध्यक्षांच्या सांगण्यावरुन माझे घर पाडले ; पिंपरीतील महिलेची फिर्याद
![Shiv Sena demolished my house at the behest of Yuvati Sena president; Complaint of a woman from Pimpri](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/WhatsApp-Image-2022-01-10-at-4.44.55-PM.jpeg)
पिंपरी । प्रतिनिधी
महिलेला मारहाण करून घराबाहेर काढून जेसीबीच्या साह्याने घर पाडले. तसेच महिलेच्या मुलाला देखील विटा फेकून मारत जखमी केले. युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुखपदी असलेल्या महिलेच्या सांगण्यावरून घर पाडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रामनगर, बोपखेल येथे शनिवारी (दि. ८) दुपारी ही घटना घडली.
अनिता नंदकिशोर बिलोरीये (वय ५०, रा. रामनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित भिवाल, नीलेश भिवाल, विवेक लवेरा, सनी भिवाल, प्रियंका भिवाल, सोनू लवेरा, निकिता पिल्ले, प्रतीक्षा घुले (रा. बोपखेल) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी सनी भिवाल याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी घरात आले. तुमची वडिलोपार्जित जमीन डेव्हलपमेंटला दिली आहे.
त्याबाबतच्या पॉवर ऑफ ॲटर्नीवर गुपचूप सही कर. नाहीतर तुला जाळून टाकू, अशी आरोपींनी धमकी दिली. फिर्यादीने सही करण्यास नकार दिला. किचनमधील गॅस शेगडी फिर्यादीच्या अंगावर फेकून मारून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीला बळजबरीने घराच्या बाहेर काढले. आरोपींनी जेसीबी मशीनने फिर्यादीच्या घराच्या भिंती व संपूर्ण घर पाडले. फिर्यादीचा मुलगा अक्षय याने जेसीबी मशीन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्याला विटा फेकून मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
यावर बोलताना घुले म्हणाल्या की, यातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतीक्षा घुले यांनी सांगितले.