डॉक्टरच्या घरी सात लाखांची चोरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/burglary-gharfod.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
डॉक्टरच्या घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 9) दुपारी मोशी येथे उघडकीस आली.
डॉ. अमोल मोहनराव पाटील (वय 36, रा. साईरंग अपार्टमेंट, संतनगर, मोशी-प्रधिकरण) यांनी बुधवारी (दि. 9) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठ ते दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी डॉ. अमोल यांचे घर बंद होते. त्यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे सेंट्रल लॉक कशाच्या तरी साह्याने उचकटून आत प्रवेश केला. घरातील सात लाख 15 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य घरफोडी करून चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.