breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तिसरी लाट थोपविण्यासाठी लहान मुलांचे स्वतंत्र हॉस्पिटल करा – उपमहापौर हिराबाई घुले

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाची दुसरी लाट स्थिरावत असतानाच  तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आणि लहान मुलांना लागण झाल्यास अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती करावी. लहान मुलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटलचे नियोजन करावे, अशी मागणी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी केली आहे. नवीन थेरगाव रुग्णालय लहान मुलांवरील उपचारासाठी ठेवता येवू शकेल का याचाही प्रशासनाने विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहराची परिस्थिती बरी होती. मृत्यूचे प्रमाणही कमी होते. दुसऱ्या लाटेत कोरोना रोगाचा शहराला मोठा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेत 30 ते 40 या वयोगटातील युवकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त राहिले. अनेक कुटुंबातील युवकांचा कोरोनाने मृत्यू झाला. अनेक कुटूंब उघड्यावर आली आहेत.  दुस-या लाटेत बेड, ऑक्सिजन, रेमडीसीविर इंजेक्शनसाठी मोठी धावपळ झाली. नियोजनअभावी प्रशासनाची धांदल उडाली. इंजेक्शनसाठी नातेवाईकांना वनवन फिरावे लागले.

दुसऱ्या लाटेत आलेला हा वाईट अनुभव लक्षात घेता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आतापासूनच सज्ज राहिले पाहिजे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच उपाययोजना करण्यास सुरुवात करावी. उपचाराच्या सुविधांअभावी लहान मुलांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. त्यासाठी आईसह मुलांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करता येईल असे कोविड केअर हॉस्पिटल सुरू करावे. त्याकरिता आवश्यक असलेले बालरोग तज्ञ यांची भरती प्रक्रिया राबवावी. ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन, औषधे याचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. जेणेकरून तिसऱ्या लाटेत रुग्णांना औषधे, उपचारासाठी धावाधाव करावी लागणार नाही. शहरातील कोरोना मृत्यूचे प्रमाण देखील वाढणार नाही.

त्याचबरोबर लहान मुलांमध्ये कोरोनाची कोणती लक्षणे दिसतात. हे  वैद्यकीय तज्ज्ञांकडून जाणून घ्यावे. कोणती आणि कशी काळजी घ्यायची.  लक्षणाबाबत जनजागृती करावी. पालकांना सजग करावे. लक्षणे दिसताच हॉस्पिटलमध्ये मुलांना दाखल करण्याचे आवाहन करावे, असेही उपमहापौर घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button