कब्रस्तान मध्ये गप्पा मारणाऱ्या प्रेमी युगुलास हाकलून लावल्याने सुरक्षारक्षकास मारहाण
![Security guard beaten after Yugulas, who was chatting in the cemetery, was kicked out](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/marhan.jpg)
पिंपरी चिंचवड | कब्रस्तानमध्ये गप्पा मारत बसलेल्या एका प्रेमी युगुलाला कब्रस्तानच्या सुरक्षारक्षकाने हाकलून लावले. सुरुवातीला हे प्रेमीयुगुल गुपचूप कब्रस्तानमधून बाहेर गेले. मात्र काही कालावधीनंतर तरुणाने त्याच्या तीन साथीदारांसोबत येऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दापोडी येथील मुस्लिम कब्रस्तान येथे घडली.आझम तसलीम खान (वय 34, रा. दापोडी) असे जखमी सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान हे दापोडी येथील मुस्लिम कब्रस्तान येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. बुधवारी दुपारी एक अनोळखी मुलगा व मुलगी कब्रस्तान मध्ये गप्पा मारण्यासाठी बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना कब्रस्तान मधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी कब्रस्तान मधून बाहेर जाताना तरुणाने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली. यानंतर ते प्रेमीयुगुल कब्रस्तान मधून बाहेर गेले.
दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपी तरुण त्याच्या तीन साथीदारांना घेऊन कब्रस्तान मध्ये आला. त्यांनी फिर्यादी यांना तू माजला का, तू आमच्या मुला-मुलींना येथून हाकलून देतो काय, असे म्हणून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या हाताला दुखापत झाल्याने ते जखमी झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.