मोरया गोसावी महाराजांच्या भूमीत ऊर्जा मिळते; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन
![Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat said that energy is found in the land of Morya Gosavi Maharaj.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Mohan-Bhagwat-780x470.jpg)
पिंपरी | चिंचवडचे स्थान पवित्र आणि जागृत आहे. येथे मोरया गोसावी यांना साक्षात्कार झाला. या ठिकाणाहून ऊर्जा मिळते, अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मंगळवारी चिंचवड येथे व्यक्त केल्या. माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो. मंगलमूर्तींचे आशीर्वाद सर्व जगाला लाभोत, अशी प्रार्थना करीत, प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव, महापालिका आयुक्त शेखर सिंह, देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र देव, ॲड. राजेंद्र उमाप यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. भागवत म्हणाले की, चिंचवडचे स्थान पवित्र आणि जागृत आहे. येथे मोरया गोसावी यांना साक्षात्कार झाला. या ठिकाणाहून ऊर्जा मिळते. या स्थानाला इतिहास लाभला आहे. श्री संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाला आहे. ज्यांचे शासन आदर्श मानले जाते, अशा शासनकर्त्यांचा सतत पाठिंंबा मिळत राहिला आहे. समाज सुस्थितीत राहावा, समाजात नीतिमत्ता वाढावी, सत्तेने समाजकारण करावे, सर्वांचे कल्याण करणारी सत्ता असावी, असा आदर्श ज्यांच्या डोळ्यांपुढे होता, त्यांचा या संस्थानशी ऊर्जा प्राप्त करण्याचे स्थान म्हणून संबंध आला आहे.
हेही वाचा – महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
जग खोटे नाही. जग एका मर्यादेपर्यंत असून परिवर्तनशील आहे. परिस्थिती येते आणि जाते. परिस्थिती बदलत जाते. परिस्थिती चांगली आणि वाईटही येते. सत्य, शास्वस्त हे तत्त्व असून ते कायम राहील. प्रत्येकाचा प्रत्येकाशी संघर्ष आहे. जगाची मांडणी आणि वागण्याची धाटणी संघर्षावर आधारित आहे. संघर्षातून जग पुढे जाते असे सांगत डॉ. भागवत म्हणाले, माणसाने समूह, सृष्टीसोबत माणुसकीने वागले पाहिजे. धर्म एकत्वाचा आधार देतो. धर्म सत्याचा मार्ग आहे. निरनिराळे अनुभव घेऊन जग सुद्धा हा मार्ग आपल्याला मिळेल या आशेने भारताकडे पाहत आहे. काळाचे चढउतार, आक्रमनातून भारतातील सनातन परंपरा जशीच्या तशी उपलब्ध आहे. याचा उपयोग करून आपण पुढे जाऊ शकतो. महापुरुषांचे चरित्र स्मरून आपण त्यांच्याप्रमाणे वागले पाहिजे. धर्म जागरणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं मोहन भागवत म्हणाले.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, चिंचवड देवस्थान ट्रस्ट सोबत मिळून मागील दोन वर्षांपासून हा सोहळा पाहता आला, हे माझे सौभाग्य आहे. देवस्थानने पवना नदीच्या परिसरातील कॉरिडॉर डेव्हलप करायला हवा. मनपा त्यासाठी मदत करेल. नद्यांची स्वच्छता करण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे.
जितेंद्र देव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक ॲड. राजेंद्र उमाप यांनी केले. देवराज डहाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले.