‘भक्ती शक्ती’च्या धर्तीवर आळंदीलगत ‘संतसृष्टी’; शिल्पसमूहाचे काम पूर्णत्वाकडे…
![‘Santasrishti’ near Alandi on the lines of ‘Bhakti Shakti’ The work of the sculpture group is nearing completion ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Screenshot_20210617-100651_Gallery.jpg)
पिंपरी |
संत ज्ञानेश्वर महाराज यांची भावंडांसह संत नामदेव महाराज यांच्यासमवेत झालेल्या भेटीवर आधारित २५ शिल्पांचा समावेश असलेले भव्य शिल्पसमूह श्री क्षेत्र आळंदीलगत चऱ्होलीत उभारण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करत सुरू केलेला आणि जवळपास १२ वर्षांपासून रखडलेला शिल्पसमूह प्रकल्प यंदाच्या पालखी प्रस्थानापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
पिंपरी चिंचवडचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या निगडित छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित भक्ती-शक्ती शिल्पसमूह उभारले आहे. त्याच धर्तीवर चऱ्होलीत ‘संतसृष्टी’ प्रकल्प उभारण्यात येत आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या संतसृष्टीतील पहिल्या टप्प्यात शिल्पसमूह तर दुसऱ्या टप्प्यात ५७ भित्तिशिल्प उभारण्यात येणार आहे. बारा वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. सुरुवातीला प्रकल्प खर्च दोन कोटी रुपये होता. आता एकूणातील आकडा २९ कोटींच्या घरात आहे.
थोरल्या पादुका मंदिरालगतच्या मैदानात साडेतीन एकर जागेत हा प्रकल्प होणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत निवृत्ती महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांच्यासह इतर २० वारकरी शिल्पांचा समावेश समूहशिल्पात आहे. आतापर्यंत २३ शिल्प बसवून झाली आहेत. संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांची शिल्पे बसवण्याचे काम राहिले आहे. ते लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या प्रकल्पाच्या ठिकाणी ६५० बैठक व्यवस्था असलेले स्वतंत्र खुले सभागृह आहे.