टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करत दरोडा; दोघांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/arrest01.jpg)
पिंपरी चिंचवड | पाच जणांच्या टोळक्याने पवनानगर, रहाटणी येथे नदीच्या किना-या जवळ पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या दिशेने सिमेंट ब्लॉक आणि दगड फेकले. एका रिक्षातून एक हजार रुपये चोरून दरोडा घातला. ही घटना शनिवारी (दि. 28) पहाटे घडली.सुरेश नामदेव सुतार (वय 25, रा. नखातेनगर, रहाटणी. मूळ रा. सातारा), सुनील यशवंत अंधारे (वय 19, रा. पवनानगर, रहाटणी. मूळ रा. लातूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहाजी मसाजी गायकवाड (वय 64, रा. पवनानगर, रहाटणी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची गाडी पवनानदीच्या किना-याजवळ पार्क केली होती. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्या गाडीची तसेच अन्य वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि अन्य लोकांना सिमेंट ब्लॉक आणि दगड फेकून मारले. मात्र यात कोणी जखमी झाले नाही. एका रिक्षा चालकाने त्यांच्या मालकाला शिफ्टचे भाडे देण्यासाठी रिक्षाच्या डिक्कीत ठेवलेले एक हजार रुपये आरोपींनी दरोडा घालून चोरून नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.