दोन प्रभागातील रस्ते, गटर सफाईसाठी 46 कोटीचा खर्च
![‘Kaveri’ blacklist; Appointment of four new consultants](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pimpri-chinchwad-PCMC-e1635920045174-3.jpg)
दोन प्रभागातील रस्ते, गटर सफाईसाठी 46 कोटीचा खर्च
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील ड आणि फ या दोन क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्ते, गटर यांची साफसफाई करण्यासाठी तीन वर्षे कालावधीसाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल 46 कोटी रूपये खर्च होणार आहेत.महापालिका आरोग्य विभागामार्फत शहरातील ड आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्ते, गटर यांची साफसफाई करण्यासाठी किमान वेतन दराने तीन वर्षे कालावधीसाठी निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार, ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील साफसफाईसाठी श्री कृपा सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी निविदा दरापेक्षा 15 टक्के कमी म्हणजेच 20 कोटी 72 लाख रूपये असा लघुत्तम दर सादर केला.
तर, फ क्षेत्रीय हद्दीतील साफसफाईसाठी परफेक्ट फॅसिलीटी सर्व्हीसेस यांनी निविदा दरापेक्षा 16.47 टक्के कमी म्हणजेच 25 कोटी 54 लाख रूपये असा लघुत्तम दर सादर केला. त्यानुसार, या दोन ठेकेदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्यासमवेत अटी-शर्तीनुसार करारनामा करून कामाचा आदेश देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने किमान वेतन दराच्या विशेष भत्त्यात वाढ केल्यास त्यानुसार, प्रत्यक्ष खर्चास मान्यता दिली जाणार आहे.