ऋतुराजचा गायकवाडचा भारतीय संघात समावेश म्हणजे वेंगसरकर ॲकॅडमी उभारण्याचे स्वप्न साकार- खासदार श्रीरंग बारणे
![Rituraj's inclusion of Gaikwad in Indian team is a dream come true for Vengsarkar Academy - MP Shrirang Barne](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/792208-shrirang-appa-barne.jpg)
पिंपरी |
महापालिकेत थेरगावचे प्रतिनिधित्व करत असताना दूरदृष्टी ठेवून विविध प्रकल्प केले. शहरातील क्रिकेटप्रेमींना सराव करता यावा, शहरातून देशासाठी खेळणारे खेळाडू घडावेत, हा उद्देश ठेवून थेरगावातील एका मोकळ्या मैदानावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी उभारली. या ॲकॅडमीत सराव करणारा खेळाडू भविष्यात भारतीय टीममध्ये देशासाठी खेळावा हे माझे स्वप्न होते. वेंगसरकर ॲकॅडमीतील खेळाडू आणि सांगवीतील रहिवासी ऋतुराज गायकवाड याची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. त्यामुळे ॲकॅडमी उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच ऋतुराजचे त्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. भारत आणि श्रीलंका यांच्यात जुलैमध्ये एकदिवसीय व T-20 मालिका होणार आहे. वेंगसरकर ॲकॅडमीतील खेळाडू ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यानिमित्ताने ऋतुराजचे कौतुक होत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने ही ॲकॅडमी उभारण्यात आली आहे.
खासदार बारणे म्हणाले, “महापालिकेत थेरगावचे प्रतिनिधित्व करत असताना पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वेंगसरकर यांच्या मदतीने दिलीप वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी उभारली. ॲकॅडमीच्या उद्घाटनाला मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना आणले होते. त्यांच्या हस्ते क्रिकेट ॲकॅडमीचे उद्घाटन झाले. या ॲकॅडमीत सराव करणारा खेळाडू भविष्यात भारतीय टीममध्ये देशासाठी खेळावा हे माझे स्वप्न होते. वेंगसरकर ॲकॅडमीतील खेळाडू ऋतुराजचा भारतीय संघात समावेश झाला आहे. त्यामुळे माझे स्वप्नं पूर्ण झाले. ऋतुराज सुरुवातीपासून वेंगसरकर ॲकॅडमीत सराव करत होता. आज त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश झाला आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्येही चमकला होता”.
ते म्हणाले, “शहरात २० वर्षे नगरसेवक म्हणून काम केले. दूरदृष्टी ठेवून थेरगाव विभागात अनेक प्रकल्प केले. त्या प्रकल्पातील एक भाग दिलीप वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी होती. या ॲकॅडमीत शहरातील अनेक खेळाडू सराव करतात. पुढे आयपीएल, देशासाठी खेळतात. या ॲकॅडमीच्या मैदानावर पूर्वी आजूबाजूचे नागरिक सकाळी प्रांतविधीला जात होते. या ठिकाणी ॲकॅडमी सुरू केली. तेव्हा येथे कोण खेळायला येणार अशी चर्चा लोक करत होते. पण, आज त्याच मैदानावर सराव करणाऱ्या ऋतुराजचा भारतीय संघात समावेश झाला आहे. याचा मला सार्थ अभिमान असून ऋतुराज नक्कीच चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे”.
गायकवाड कुटूंबीय सांगवीत राहते. अतिशय गरीब आणि सर्वसामान्य कुटुंब आहे. या कुटुंबातील ऋतुराजचा आज भारतीय संघात समावेश झाला आहे. यासाठी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे प्रचंड श्रम, कष्ट आहेत. दर आठवड्याला येवून खेळाडूंचा सराव घेतात. मार्गदर्शन करतात. वेंगसरकर माझे मित्र असून त्यांना सोबत घेऊन ॲकॅडमी उभारली. ॲकॅडमीतील खेळाडू भारतासाठी खेळू लागल्याने स्वप्न सत्यात उतरले असल्याचे खासदार बारणे म्हणाले.