ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात

महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

पिंपरी-चिंचवड : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी उपस्थितांना तसेच शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, ‘भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीस ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस आपल्या लोकशाही परंपरेचा, संविधानिक मूल्यांचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या सातत्यपूर्ण प्रवासाचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण प्रसंगी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मी सर्व शहरवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देतो.’

‘शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध आहे. स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ई-प्रशासन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी उपक्रमांमुळे आपले शहर देशभरात वेगळा ठसा उमटवत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना विविध सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या विकासप्रक्रियेत नागरिकांनीही प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले आहे. विशेषतः करप्रणाली अधिक सुलभ व पारदर्शक केल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मिळकतकर वेळेत भरला. याबद्दल सर्व करदात्यांचे मनःपूर्वक आभार. उर्वरित तिमाहीमध्ये ज्यांनी अद्याप मिळकतकर भरलेला नाही, त्यांनी तो वेळेत भरून शहराच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केले.

या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य मंदार देशपांडे,नगरसदस्या अनुराधा गोरखे, आशा सूर्यवंशी, मधुरा शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, नगरसचिव मुकेश कोळप, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, अनिल भालसाखळे, उपआयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, डॉ. प्रदीप ठेंगल, संदीप खोत, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…

पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२६ नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीचे कामकाज उत्कृष्टपणे व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडणाऱ्या महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

रक्तदान शिबिराचेही उद्घाटन…

प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या वैद्यकीय विभाग व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तकेंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे…

* २६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून लोकशाही राष्ट्र म्हणून एक नवा इतिहास घडविला. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख असलेल्या आपल्या देशाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांच्या बळावर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती करीत जागतिक पातळीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना हक्क दिले, कर्तव्यांची जाणीव करून दिली. आज प्रजासत्ताक भारताच्या या ऐतिहासिक प्रवासाला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. सर्वप्रथम मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या तसेच भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी आपले अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व थोर व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

* आपला देश आज विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने प्रगती करत आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरही विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास पाहिला, तर हे शहर केवळ औद्योगिक प्रगतीचे प्रतीक नव्हे, तर श्रमसंस्कृती आणि आधुनिक नागरी विकासाचे उत्तम उदाहरण आहे. औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. विविध राज्यांतील नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. बहुसांस्कृतिक शहर म्हणून पिंपरी चिंचवडची आज विशेष ओळख आहे. पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक व नागरी केंद्र म्हणून ओळखले जाते.

* स्वच्छता, नागरी सुविधा व नागरिकांचा सहभाग या बाबतीत आपल्या शहराने नेहमीच आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहराने राज्यात प्रथम क्रमांक आणि देशात सातवा क्रमांक पटकावला होता. ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी आपल्याला जोरदार तयारी करायची आहे. राज्यातील पहिला क्रमांक अबाधित ठेवून देशात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रत्येक शहरवासीयाने सक्रिय सहभाग घ्यावा तसेच पिंपरी चिंचवड हे देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध शहर बनविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.

* राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांच्या क्रमवारीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही आपल्या सर्व पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या जुलै व ऑगस्ट २०२५ च्या रँकिंगमध्ये मातृत्व व बाल आरोग्य, लसीकरण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार नियंत्रण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, आयुष्मान भारत, प्रशासन व वित्तीय व्यवस्थापन अशा विविध महत्त्वाच्या निकषांवर उत्कृष्ट कामगिरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केली आहे. हे यश सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळेच शक्य झाले असून, भविष्यातही गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्यसेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

* शहरात नुकतीच ‘पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहर आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. अनेक देशांतील क्रीडाप्रेमी व सहभागी खेळाडूंनी आपल्या शहराचे सौंदर्य, उत्तम पायाभूत सुविधा आणि सुयोग्य व्यवस्थापन यांचे विशेष कौतुक केले. हे सर्व नागरिकांच्या सहकार्याशिवाय शक्य झाले नसते. भविष्यातही अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांत आपले शहर सक्रिय सहभाग घेऊन जागतिक पातळीवर नाव उज्ज्वल करेल.

* महापालिकेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर प्रशासनाचा विशेष भर आहे. पायाभूत सुविधा, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. विविध योजना व उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. महापालिका शाळा या विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र म्हणून अधिक सक्षम होत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध आहे.

* महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी संस्थात्मक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सक्षम व आत्मनिर्भर महिला घडविणे हे शहराच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

* शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पायाभूत सुविधा व पर्यावरण संरक्षणासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. अमृत-१ व अमृत-२.० योजनांअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी अत्याधुनिक एसबीआर पद्धतीची मैलाशुद्धीकरण केंद्रे, जलनिःसारण नलिकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांमधील प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत झाली आहे. याचबरोबर शहरातील रस्ते, सायकल ट्रॅक आणि पाणीपुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत गुंतवणूक करण्यात येत आहे. पवना, मुळा व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांद्वारे नदीकाठ संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि नैसर्गिक पर्यावरण पुनर्स्थापनेवर विशेष भर देण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड शहर अधिक स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि नागरिकांसाठी अधिक राहण्यायोग्य बनण्यास निश्चित मदत होणार आहे.

* मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असून तिच्या संवर्धन व प्रसारासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, मराठी भाषेचा अभिमान जपावा आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करावा.

* नुकतीच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. या लोकशाही प्रक्रियेतून नवनिर्वाचित नगरसदस्य व नगरसदस्या निवडून आले आहेत. मी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करतो. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी परस्पर सहकार्य, समन्वय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून एकत्र काम केल्यास शहराच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल. पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करूयात.

* निवडणुकीच्या काळात महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा प्रशंसनीय आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करत त्यांनी दिलेले योगदान लोकशाही प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचे ठरले आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार.

* या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण संविधानाने दिलेल्या मूल्यांचा अवलंब करून जागतिक दर्जाचे पिंपरी चिंचवड शहर घडवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मिळून भारतीय संविधानाची मूल्ये जोपासत आपल्या देशाला अग्रेसर बनविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूयात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button