पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडीला दिलासा!
PMRDA: चाकण परिसरात 4 ‘मिसिंग लिंक’ उभारणार!

पुणे | मुंबई-पुण्यानंतर आता पुणे-नाशिक महामार्गवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने चार ‘मिसिंग लिंक’ रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २६१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गांमुळे चाकण-तळेगाव, तळेगाव तसेच शिक्रापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणे-नाशिक (Pune)महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनचालकांना दीड ते दोन तास कोंडीत अडकून पडावे लागते. वाहतूक पोलिस आणि प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या, जसे की अवजड वाहनांवर वेळेचे निर्बंध, अतिक्रमण हटविणे, रिक्षा स्टँड आणि बस स्थानके हलविणे; मात्र या उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. चाकणमधील तळेगाव चौक, आंबेठाण चौक आणि आळंदी फाटा येथे कोंडीची समस्या अधिक तीव्र आहे.
हेही वाचा : मुंबई–पुणे प्रवासासाठी नवीन बायपास मार्गास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत वाहतूक कोंडीवर तात्पुरता उपाय म्हणून पीएमआरडीएकडून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संबंधित मार्गांवर आरक्षण टाकण्यात आले असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या मार्गांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार आहेत. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
जोडरस्ते उभारणार..
या प्रकल्पांतर्गत चार महत्त्वाचे जोडरस्ते उभारले जाणार आहेत. हिंगणे चौक ते चाकण एमआयडीसी टप्पा तीन (फोक्सवॅगन परिसर, खराबवाडी) दरम्यान ९०० मीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार आहे. तसेच नाणेकरवाडी येथील सॅनी कंपनीपासून राष्ट्रीय महामार्ग ६० वरील समृद्धी CNG पंपापर्यंत सुमारे १.२ किलोमीटर लांबीचा आणि १५ मीटर रुंदीचा रस्ता उभारला जाणार आहे.
चाकण परिसरातील वाहतूक विभाजन..
याशिवाय मेदनकरवाडी येथील बंगला वस्ती चौक ते राष्ट्रीय महामार्ग ५५ वरील रासे फाटा दरम्यान २.५ किलोमीटर लांबीचा आणि ३६ मीटर रुंदीचा मार्ग विकसित केला जाणार आहे. तसेच वेस्टर्न बायपास अंतर्गत पुणे-नाशिक महामार्ग ते चाकण एमआयडीसी टप्पा ५ आणि तळेगाव एमआयडीसी ते जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा ८५० मीटर लांबीचा आणि ६० मीटर रुंदीचा महत्त्वाचा रस्ता उभारण्यात येणार आहे. या सर्व ‘मिसिंग लिंक’ मार्गांमुळे चाकण परिसरातील वाहतूक विविध दिशांना वळवता येणार असून, मुख्य चौकांवरील ताण कमी होऊन कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.





