..अखेर दीडशेहून अधिक कुटुंबांचा ‘वनवास’ संपला..!
DPDC योजनेतून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्याने दिलासा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

पिंपरी–चिंचवड | चऱ्होली परिसरातील सेव्हन हिल्स रेसिडेन्सी खंडोबामाळ येथील रहिवाशांना गेल्या काही वर्षांपासून भेडसावणाऱ्या कमी व्होल्टेज व सतत होणाऱ्या विद्युत फ्लक्चुएशनच्या गंभीर समस्येतून अखेर दिलासा मिळाला आहे. माजी महापौर व विद्यमान नगरसेवक नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर यांच्या पाठपुराव्याने आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून DPDC योजनेअंतर्गत दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी या परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून, त्यामुळे दिडशेहून अधिक कुटुंबांचा दैनंदिन जीवनातील मोठा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.
चऱ्होलीतील सेव्हन हिल्स रेसिडेन्सीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी वास्तव्यास आहेत. मात्र मागील एक वर्ष अत्यंत कमी व्होल्टेजमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. घरातील फ्रीज, पंखे, पाणी उपसण्याच्या मोटर्स तसेच इतर विद्युत उपकरणेही व्यवस्थित कार्यरत राहत नव्हती. विशेषतः पाणीपुरवठ्यासाठी बोअरवेल सुरू करण्यासाठी अनेकदा रहिवाशांना रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागत होते. ‘वर्क फॉर्म होम’ करणाऱ्या युवकांना देखील या परिस्थितीचा मोठा त्रास होत होता. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या.. याचा थेट परिणाम दैनंदिन कामकाजावर व जीवनमानावर होत होता.

हेही वाचा : एका पराभवाने खचून जायचे नाही; ज्ञानदेव रांजणे
ही समस्या रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ हालचालींना वेग आला. माजी महापौर नितिन काळजे आणि नगरसेवक सचिन तापकीर यांनी ही बाब गांभीर्याने घेत आमदार महेश लांडगे यांच्याकडे याबाबत माहिती दिली.
आमदार लांडगे यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत DPDC योजनेतून नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून प्रत्यक्ष बसवून दिला. ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर परिसरात आता स्थिर व योग्य व्होल्टेज मिळत असून सर्व घरगुती उपकरणे सुरळीतपणे चालू लागली आहेत. पाणीपुरवठा, घरकाम व इतर दैनंदिन व्यवहार कोणत्याही अडथळ्यांशिवाय होत असल्याने रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
“वीज आणि पाण्यासाठीचा आमचा एक वर्षांचा वनवास जणू काही कायमचा संपला आहे,” अशी भावना येथील रहिवाशांच्या मनात असून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व दिलासा स्पष्टपणे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार महेश लांडगे यांचे कार्यालयीन प्रतिनिधी पुनित गळीतकर यांनी विशेष सहकार्य, योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात मोलाची भूमिका बजावली.
सेव्हन हिल्स रेसिडेन्सी येथील सर्व रहिवाशांनी आमदार महेश लांडगे, मा. महापौर नितिन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर आणि पुनित गळीतकर यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लागू शकतात याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना व्यक्त केली आहे.
वीज, पाणी व इतर मूलभूत सुविधा सुरळीत मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्या दृष्टीने कोणत्याही भागातील नागरिक अडचणीत असतील तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. मा. महापौर, नगरसेवक नितिन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर आणि सहकाऱ्यांच्या समन्वयामुळे हा प्रश्न मार्गी लागला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड.




