एका पराभवाने खचून जायचे नाही; ज्ञानदेव रांजणे
जावळीत कुसुंबी गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न; नव्या जोमाने कामाला लागण्याचा आदेश

कुडाळ | मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढविल्या असून एका पराभवाने खचून जाणाऱ्यातला मी नाही तर पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागून लोकांसाठी राबण्याची आमची तयारी असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले.
आंबेघर तर्फ मेढा या ठिकाणी कुसुंबी गटातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कुसुंबी गट व त्यातील दोन गण भाजपाला गमवावे लागले. नेमक्या काय चुका झाल्या या संदर्भात आत्मचिंतन करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
ज्ञानदेव रांजणे भाषणात पुढे म्हणाले, मुंबईवरून येऊन चार दिवस निवडणुकांपुरते राहून पर्यटन करणारे आम्ही नसून जनतेच्या सुखदुःखात चोवीस तास इथेच राहून आम्ही काम करत आहोत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात तालुक्यामध्ये कोट्यावधींची विकास कामे झाली असतानाही विरोधकांचे एकही काम नसताना त्यांना यश मिळाले हा आपण आपले काम लोकांपर्यंत न पोचवल्याचा परिणाम आहे. यापुढील काळात विरोधक दिलेली आश्वासने पूर्ण करताहेत किंवा नाही यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. नाही तर विकास आपण करायचा आणि त्याचे श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचे असं होवू नये यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहिले पाहिजे.
हेही वाचा : मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
शिवेंद्रसिंहराजेंचे हात भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
निवडणुका संपल्या असल्या तरी आगामी काळात शिवेंद्रसिंहराजे यांचे हात भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खचून न जाता कामाला लागावे मी तुमच्या पाठीमागे खंबीर आहे असेही शेवटी त्यांनी सांगितले.
दरम्यान सुरुवातीला विविध गावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय चुकले त्यासंदर्भात भूमिका मांडल्या. यामध्ये विरोधकांनी नातीगोती पुढे करून मते मागितली, तसेच लाडकी बहिण योजनेचे पैसे बंद होतील, बोंडारवाडी धरण फक्त आम्हीच करू आधी फेक नरेटिव्हच्या माध्यमातून प्रचार केल्याने पराभव झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
माझ्या नेतृत्वात कुठे उणीव असेल, मी कमी पडत असेल तर मी थांबतो तुमच्यापैकी कोणीही नेतृत्व करावे मी त्याचा कार्यकर्ता म्हणून पुढे राहून काम करेन असे आवाहन ज्ञानदेव रांजणे यांनी करताच कार्यकर्त्यांमध्ये शांतता पसरली. ज्ञानदेव रांजणे आपणच नेतृत्व करा आम्ही तुमच्या सोबत आहोत हा शब्द बहुतांश कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.




