‘आयटीआय’मधील मुलींच्या अभ्यासक्रमांबाबत जनजागृती करा!
![Raise awareness about girls' courses in ITI!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-14-at-12.50.55-PM.jpeg)
- नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांची मागणी
- महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने मुलींना कौशल्यक्षम (Industrial Training Institute) शिक्षण मिळावे, या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) स्थापना केली आहे. येथे विविध योजना आखल्या आहेत. त्यानुसार मुलींची प्रवेशसंख्या वाढली. मात्र, मागील दोन वर्षांपासून मुलींचा ओघ घटत आहे. दरवर्षी सरासरी एक हजार विद्यार्थिनींनी आयटीआय प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आयटीआयमधील मुलींच्या अभ्यासक्रमांबाबत शहरामध्ये प्रभावी जनजागृती करावी, अशी मागणी भाजपा नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मुलींसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या ३० टक्के जागा आरक्षित आहे. शहरातील शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून जवळपास दीड हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आयटीआयमध्ये ११ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम होण्यासाठी त्यांना कौशल्यक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. विशेष अभ्यासक्रमांबरोबरच मुलांचे वर्चस्व असलेल्या अभ्यासक्रमामध्ये मुलींना प्रवेश दिला जात आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून आयटीआयच्या अभ्यासक्रमांकडील मुलींचा ओढा कमी होताना दिसत आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
- मुलींनी तांत्रिक क्षेत्रात करिअर करावे : सारिका बोऱ्हाडे
औद्योगिक क्षेत्रांमध्ये “वूमन एम्पॉवरमेंट” बाबत मागणी आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी तांत्रिक क्षेत्राकडे यावे, जेणेकरून त्यांना रोजगाराची तसेच, स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होईल, अशी मागणी असताना या आयटीआय संस्थेकडे मुलींनी पाठ का फिरवली? याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांपासून ‘आयटीआय’च्या अभ्यासक्रमांकडे मुलींचा ओढा कमी होताना दिसत आहे. दरवर्षी विद्यार्थिनी ‘आयटीआय’ प्रवेशाकडे पाठ फिर असल्याने आरक्षित जागा रिक्त राहत आहेत. टाटा मोटर्स , महिंद्रा यांसारख्या कंपनीमध्ये केवळ महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलींना तांत्रिक कौशल्य क्षेत्राकडे यावे. यासाठी महापालिकेने जनजागृती करावी, असेही बोऱ्हाडे यांनी म्हटले आहे.