breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात पावसाचा धुमाकूळ; पोलीस आयुक्तांनी ‘ऑन फिल्ड’ उतरून घेतला आढावा

पिंपरी : कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे घरांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तसेच काही ठिकाणचे रस्ते व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. याबाबत पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले तसेच मदत व बचावकार्य करण्यात आले. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी थेट रस्त्यावर उतरून आढावा घेतला.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी रिव्हर व्ह्यू चौक, चिंचवड गाव ,पिंपरी गाव, काळेवाडी पूल, चिखली, भोसरी, भारत माता चौक, एमआयडीसी आदी ठिकाणी पाहणी केली. तसेच पूरस्थितीबाबत माहिती घेऊन आढावा घेतला. पिंपरी येथील संजय गांधी नगर झोपडपट्टी, सुभाष नगर झोपडपट्टी येथे पाणी घुसल्याने तेथील कुटुंबीयांना पिंपरी नगर येथील कमला नेहरू हिंदी प्राथमिक विद्यालयात स्थलांतरीत करण्यात आले. तेथे त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या विद्यालयात भेट देत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बहुतांश ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले तसेच पवना, इंद्रायणी, मुळा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच नदीपात्रालगतच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. काही रस्ते देखील पाण्याखाली जाऊन रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. त्यामुळे भर वस्तीमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याबाबत पोलीस आयुक्त चौबे यांनी पोलिसांना सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही मदत करत नागरिकांना दिलासा दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button