‘पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा ‘ ला शानदार प्रारंभ, इच्छुक उमेदवारांना मिळाले व्यासपीठ
![‘Pune Municipal Election Ichchhuk Katta’ got off to a great start, aspiring candidates got a platform](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/pune-katta.jpg)
पिंपरी चिंचवड | ‘सार्वजनिक जीवनातील, राजकीय जीवनातील संवाद हरवू न देता पुण्याची सर्वसमावेशक संस्कृती पुढे नेली जावी.कट्टा संस्कृती,कट्टा उपक्रम हे त्यासाठी उपयुक्त ठरतील’, असा सूर शनीवारी उमटला.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या समंजस, सुसंस्कृत , सर्वसमावेशक संस्कृतीला पुढे नेण्यासाठी रामविलास पासवान प्रणित लोकजनशक्ती पार्टी यांच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व कार्यकर्त्यांना खुले असणारे विचारांचे आदान-प्रदान करणारे कट्टा व्यासपीठ तयार करण्यात आले असून या व्यासपीठाला ‘पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा’ असे नाव देण्यात आले आहे. या कट्टयाचा शानदार प्रारंभ शनीवारी सकाळी मार्केट यार्ड येथील ‘ अण्णा इडली ‘ हॉटेल येथे झाला.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. ‘ सर्वसमावेशकता आणि परस्पर संवाद हे पुण्याचे वैशिष्टय आहे. त्यातून कट्टा संस्कृती सुरू झाली. याही कटट्यातून संवाद आणि पुण्याची संस्कृती पुढे जावी.पुढील कट्ट्याला आवर्जून उपस्थित राहणार आहे ‘, असे ते म्हणाले. ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार यांनीही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या .लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर-जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट,प्रदेश सरचिटणीस अमर पुणेकर,उपक्रमाचे समन्वयक डॉ.दीपक बीडकर यांनी स्वागत केले.
उद्घाटन कार्यक्रमाला पुण्यातील राजकीय नेते आणि कट्टा संस्कृतीतील अग्रणी डॉ. सतीश देसाई,(काँग्रेस नेते आणि वाडेश्वर कट्टा प्रणेते),अंकुश काकडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते,वाडेश्वर कट्टा प्रणेते),अॅड.गणेश सातपुते (मनसे नेते,वैशाली कट्टा,पुणे कट्टा प्रणेते), अप्पा रेणुसे ( ऐश्वर्य कट्टा ) पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांनी इडली सांबार, चहाचा आस्वाद घेतला.डॉ. सतीश देसाई यांनी सर्वांना ‘ पुण्यभूषण ‘ दिवाळी अंक भेट दिले.अंकुश काकडे यांनी पुष्पगुच्छ देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या . नवोदितांना सूचना,जुन्यांचे राजकीय आणि कट्टा संस्कृतीचे किस्से ,एकमेकांना दिल्या -घेतलेल्या कोपरखळ्या आणि परस्परांच्या कट्ट्यावर येण्याचे निमंत्रण यामुळे कट्ट्याला रंगत आली !
आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन व्हावे,निवडणूक तयारीबद्दल आदानप्रदान करता यावे,सर्वपक्षीय विचारांची देवाणघेवाण व्हावी,शहरातील वातावरण द्वेषमुक्त राहावे.याकरिता हा कट्टा सुरू करण्यात आला आहे.एकेकाळी ‘मंडई’ हाच सामाजिक-राजकिय कार्यकर्त्याचा कट्टा हा वैचारिक आदान प्रदानाचा ठिय्या होता, आता विस्तारित पुण्याचा ‘मार्केट यार्ड कट्टा’हादेखील ठिय्या व्हावा,असा मनोदय आहे,असे संजय आल्हाट यांनी सांगितले.