बुधवारी रात्री पुणे जिल्ह्यात सरासरी 2.44 मिलीमीटर पावसाची नोंद
पिंपरी चिंचवड | पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह मुळशी आणि खेड वगळता जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला. दक्षिणेकडील वारे मध्य महाराष्ट्रात आल्याने तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी रात्री सरासरी 2.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.हवामान विभागाने कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच बुधवारी महाराष्ट्रातील किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी शनिवार (दि. 20) पर्यंत पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील तापमान किमान 20.6 तर कमाल 32.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. बुधवारी आणि गुरुवारी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.बुधवारी मध्यरात्री अडीच्या सुमारास पुण्यात पावसाने हजेरी लावली. पुणे शहरात 4.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मावळात 0.49 मिलीमीटर पाऊस पडला, तर सर्वाधिक पाऊस बारामती तालुक्यात (8.50 मिलीमीटर) पडला. जिल्ह्यात बुधवारी एकूण 34.23 मिलीमीटर पाऊस पडला असून सरासरी 2.44 मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे.