पुनावळे अपघात प्रकरण: आमदार शंकर जगताप यांची तातडीने ‘‘ॲक्शन’’
रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक नियंत्रण आणि ऑक्सिजन पार्कसाठी हालचालींना वेग

पिंपरी-चिंचवड : पुनावळे परिसरात बुधवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेला प्राण गमवावे लागले. या हृदयद्रावक घटनेची तातडीने दखल घेत आमदार शंकर जगताप यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांसोबत रस्त्यांची आणि वाहतूक व्यवस्थेची सखोल पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध तातडीच्या उपाययोजना त्वरित राबवण्याचे निर्देश दिले आहे.
यावेळी भाजपाचे राहुल काटे, नवनाथ ढवळे, चेतन भुजबळ यांच्यासह परिसरातील स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सोसायटीधारक उपस्थित होते.
पुनावळे येथील काटेवस्ती चौकाजवळ 30 जुलै 2025 रोजी दुपारी सुमारे 2.45 वाजता एक भीषण अपघात घडला. या अपघातात स्कुटीवरुन जात असलेल्या 33 वर्षीय महिलेला भारत बेन्ज ट्रकने धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला असून, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. रावेत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, ट्रकचालकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील सोसायटीधारकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
हेही वाचा – एका क्लिकवर मिळणार पिंपरी महापालिकेच्या ५७ नागरी सेवा
तातडीच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे:
1. अपघात प्रवण ठिकाणांवरील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती
2. आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकरची उभारणी
3. दिवसा अवजड वाहनांवर बंदी
4. चालू रस्त्यांवरील कामांभोवती बॅरिकेड्स व चेतावणी स्टिकर्स
5. मुख्य रस्त्यावर पाणी सोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई
6. वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे
7. सर्व रस्त्यांना खड्डेमुक्त करणे
8. प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसविणे
9. मुख्य रस्त्यावर अतिरिक्त स्पीड ब्रेकर
10. नवीन भुयारी मार्गाचे काम त्वरीत सुरू करणे
11. डी.पी. रोडचे काम पावसाळ्यानंतर सुरू करणे
ऑक्सिजन पार्कसाठी पाठपुरावा…
पुनावळेतील वनीकरणाच्या जागेवर “ऑक्सिजन पार्क” उभारण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा सुरू असून लवकरच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले जाईल, अशी माहिती आमदार शंकरभाऊ जगताप यांनी दिली.
पुनावळेकरांचा हक्कांचे संवर्धन…
“महापालिकेला भरलेल्या कराच्या मोबदल्यात पुनावळेकरांना आवश्यक सर्व सुविधा मिळाव्यात,” ही आमदार जगताप यांची ठाम भूमिका असून, त्यांनी सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. या दुर्घटनेनंतर राहुल काटे यांनी PCMC कार्यालयात जाऊन कामास विलंब का होतोय, याबाबत पाठपुरावा केला. तसेच वाहतूक पोलिस आयुक्तालयात भेट देऊन अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्याची मागणीही केली आहे. “ही एक दिवसाची लढाई नाही; आपण सर्वजण मिळून हा परिसर सुरक्षित व सुस्थितीत करू,” असे श्री. काटे यांनी म्हटले आहे.





