हिंजवडीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; एकास अटक

पिंपरी | हिंजवडी येथील Heaven Spa या स्पा सेंटरवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून स्पाच्या आड चालणारा देहव्यापार उघडकीस आणला. या प्रकरणी स्पा मॅनेजर वासुदेवन मणी पिल्लेय (वय ४१, रा. पाषाण, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम हाइट्स बिल्डिंग, तिसरा मजला, शॉप नं. ३०१, सर्व्हे नं. ६/१२/२, हिंजवडी (ता. मुळशी) येथे हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ६ मार्च रोजी रात्री कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : शंकराचार्यांवर आरोप करणाऱ्या ब्रह्मचारींवर हल्ला, नाक कापण्याचा प्रयत्न
आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता व त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःची उपजीविका करत असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित स्पा सेंटरच्या जवळ हॉस्पिटल, डेंटल क्लिनिक तसेच महिला विद्यार्थिनींचे वसतिगृह असूनही हा प्रकार सुरू होता.
या प्रकरणी महिला पोलीस हवालदार निलम संतोष बुचडे यांच्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १४०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.





