शंकराचार्यांवर आरोप करणाऱ्या ब्रह्मचारींवर हल्ला, नाक कापण्याचा प्रयत्न

Shankaracharya Avimukteshwaranand | शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून हल्लेखोरांनी त्यांचे नाक कापण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील कोशाम्बी जिल्ह्यात असलेल्या सिराथू या रेल्वे स्टेशनच्या जवळ ट्रेन होती. त्या ट्रेनमध्ये आशुतोष ब्रह्मचारी बसले होते. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांचं नाक कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर वारही करण्यात आले आणि त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. आशुतोष ब्रह्मचारी कसेबसे स्वच्छतागृहात पळाले आणि त्यांनी दार लावून घेतलं. ज्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर हल्ला कुणी केला हे अद्याप स्पष्ट नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
हेही वाचा : गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष ब्रह्मचारी हे प्रयागराजला जात असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांकडे धारदार हत्यारं होती. हल्लेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर वार केले तसंच त्यांचं नाक कापण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यावेळी आशुतोष ब्रह्मचारी पळाले आणि त्यांनी स्वच्छतागृहात स्वतःला बंद करुन घेतलं. हल्लेखोरांनी हा दरवाजा तोडण्याचाही प्रयत्न केला. पण तोपर्यंत रेल्वेच्या डब्यात हलकल्लोळ माजला होता त्यामुळे हल्लेखोरांनी तिथून काढता पाय घेतला. तसंच इतर प्रवासीही तोपर्यंत सावध झाले होते आणि मदतीसाठी हाका मारत होते. त्यामुळे हल्लेखोर पळाले. आशुतोष ब्रह्मचारी यांनी स्वच्छतागृहातूनच पोलिसांना फोन केला आणि घडलेली घटना सांगितली. प्रयागराजला ट्रेन पोहचल्यानंतर पोलीस तिथे आले आणि आशुतोष ब्रह्मचारींना रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले.





