‘सायबर सुरक्षेमधून प्रगती शक्य’; डॉ. शेंग लुंग पेंग
शिक्षण विश्व: आकुर्डीतील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शोध निबंध परिषद

पिंपरी चिंचवड : सायबर सुरक्षा सुनिश्चित केल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. इंटरनेट डेटाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर ‘ ‘सायबर सिक्युरिटी’ राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग बनली आहे.ते रोखण्याकरता सायबर सिक्युरिटी ही सक्षम असलीच पाहिजे. पुणे शहर हे टेक्नॉलॉजीचे केंद्र आहे व पुण्यामध्ये संगणकीय ज्ञान प्रगत असून सायबर सिक्युरिटी च्या नवनवीन कल्पना येथे उगम पावतात, असे प्रतिपादन नॅशनल तैपेई युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस (क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आणि डिझाइन विभाग) तैवानचे डायरेक्टर डॉ. शेंग लुंग पेंग यांनी केले.
डी. वाय.पाटील शैक्षणिक संकुलनातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या परिषदेसाठी विशेष निमंत्रित कम्प्युटर शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक, टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाऊन कोलकाताचे डॉ. नीलजन डे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या असिस्टंट कन्सल्टंट श्रीमती स्मिता जाधव, पिंपरीच्या सायबर क्राईम डिपार्टमेंटचे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन सर, डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम(निवृत्त), शैक्षणिक संकुलाचे मुख्य वित्तीय अधिकारी बी. एच. शर्मा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालती, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ संदीप सरनोबत, परिषदेचे समन्वयक माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ लतिका देसाई , स्थापत्य अभियांत्रिकी चे विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे, तसेच परिषदेचे सहसमन्वयक डॉ. कल्याण बामणे, व डॉ. तपोब्रता डे आदी उपस्थित होते.
डॉ. नीलांजन डे यावेळी म्हणाले आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचा वापर खूप होत आहे. याचा उपयोग करून मोठमोठे स्टार्टअप सुरू होत आहेत, यातूनच देशाची प्रगती साधता येईल.
पिंपरीच्या सायबर क्राईम डिपार्टमेंटचे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांनी सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि ते रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती असणे आवश्यक आहे म्हणून सायबर सिक्युरिटी चा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे , असे नमूद केले.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींकडून सुरक्षा परिस्थितीचा आढावा; भविष्यातील कारवाईची रणनीती आखली
टाटा टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या असिस्टंट कन्सल्टंट श्रीमती स्मिता जाधव म्हणाल्या, संशोधकांनी नवनवीन तंत्रज्ञान व पद्धती अमलात आणून संशोधन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटी चे महत्व खूप वाढले असून प्रत्येक पंधरा दिवसाला या संदर्भातील प्रशिक्षण कंपनी कर्मचाऱ्यांना देत असते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पी मालती यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाविद्यालयाची माहिती दिली आणि सर्व मान्यवारांच्या उपस्थिती मुळे कॉन्फरेन्स मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन कल्पना, संशोधन आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होईल असे प्रतिपादन केले.
यावेळी परिषदेच्या समन्वयक डॉ. लतिका देसाई व डॉ. अशोक मोरे यांनी परिषदेची विस्तृत माहिती देऊन उपस्थित यांचे स्वागत केले.तब्बल 176 शोधनिबंध या कॉन्फरन्स साठी प्राप्त झाले असून त्यातील 145 पेपर ची निवड केली आहे. एकूण 7 सत्रांमध्ये हे पेपर सादर केले जाणार आहेत. भारताच्या विविध राज्यातून विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक, तसेच भारताबाहेरील विविध रिसर्च स्कॉलर्स आपले संशोधन या कॉन्फरन्स मध्ये सादर होतं आहेत.
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराधना चव्हाण, डॉ. सुहास पाटील यांनी केले. ह्या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली, त्यासाठी परिषदेचे सहसमन्वयक डॉ. बामणे आणि डॉ. तपोब्रता डे यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी, डी वाय पाटील आकुर्डी संकुलाचे चेअरमन सतेज पाटील, डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थी दशेतच संशोधनाची बीजे रोवली पाहिजे – अमित विक्रम
डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी आजच्या बदलत्या परिस्थितीत मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे व त्यासाठी तंत्रज्ञान संशोधनाची स्पर्धा व मागणी वाढत चालली आहे. याकरिता विद्यार्थी दशेतच संशोधनाची बीजे रोवली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.