ई-गव्हर्नन्समध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा राज्यात प्रथम क्रमांक
![Pimpri Chinchwad Municipal Corporation ranks first in the state in e-governance](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/FB_IMG_1540230386345-1.jpg)
पिंपरी | नागरिकांना माहिती आणि विविध सुविधा ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील ई गव्हर्नन्समध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात प्रथम आली. राज्यातील 27 महापालिकांमध्ये पिंपरी अग्रस्थानी आहे. पॉलिसी रीसर्च ऑर्गनायझेशन या विचार गटाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली.राज्यातील महापालिकांतील ई गव्हर्नन्सबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत हा सर्वे करण्यात आला. सेवा, पारदर्शकता, उपलब्धतता या तीन निकषांवर अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ऑप्लिकेशन आणि समाजमाध्यमे यांचा अभ्यास करण्यात आला. नागरिकांना सोप्या पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, व्यवहारात पारदर्शकता असावी आणि आवश्यक माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी हा ई गव्हर्नन्सचा उद्देश आहे.
यांनी केले सर्वेक्षण
तन्मय कानिटकर, मनोज जोशी, नेहा महाजन, साक्षी सोहोनी, सुघोष जोशी, गौरव देशपांडे, कुंजन पेडणेकर, अभिषेक चव्हाण, अंकिता अभ्यंकर, चैताली पाठक, होझेफा पिठापूरवाला यांचा सर्वेक्षणात सहभाग होता. सेवा या निकषावर पुणे, मीरा भाईंदर, पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वोत्म ठरल्या आहेत.
सर्वेक्षणातील निरीक्षणे
राज्यातील 27 महापालिकांमध्ये हा सर्वे करण्यात आला. ई गव्हर्नन्ससंदर्भात सर्वच महापालिकांना सुधारणेला भरपूर वाव आहे. संकेतस्थळावरील माहितीमध्ये स्पेलिंगच्या चुका, माहिती अद्यावत नसणे अशा त्रुटी आढळल्या. अनेक महापालिकांनी gov.in किंवा nic.in अधिकृत सरकारी डोमेन नेम वापरलेले नाही. एकाच महापालिकेची एकापेक्षा जास्त समाजमाध्यम पाने असणे. समाजमाध्यपाने महापालिकेच्या संकेतस्थळावर अद्यावत नसणे, संकेतस्थळाचा पत्ता वेगवेगळा असल्याचे दिसून आल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.