breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आमदार महेश लांडगेंना ‘झुकते माप’

‘‘ स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’’ला आणखी अडीच एकर अतिरिक्त जागा : ‘पीएमआरडीए’ च्या अर्थसंकल्पात दोन मोठ्या मागण्या केल्या मान्य

पुणे ।  विशेष प्रतिनिधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प पदसिद्ध अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांना ‘झुकते माप’ देण्यात आले आहे. आमदार लांडगे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मोशी येथे साकारण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे ‘‘ स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’’ हे स्मारक उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याची भव्यता आणखी वाढवण्यासाठी ‘पीएमआरडीए’ कडून अतिरिक्त अडीच एकच जागा विनामूल्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे पीएमआरडीए प्राधिकरणाची दहावी बैठक झाली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी अधिकारी उपस्थित होते.

‘‘ स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्राची शान…

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचिरित्रावर आधारित शंभू सृष्टी आणि जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा मोशी-पिंपरी-चिंचवड येथे उभारण्यात येत आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ हे जगभरातील शिव-शंभूभक्तांचे स्फूर्तीस्थान राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा चौथरा ४० फूट असून, पुतळ्याची उंची १०० फूट इतकी असणार आहे. जागतिक किर्तीचे शिल्पकार राम सुतार आणि प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.

…. असा आहे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण!

– छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची : १४० फूट

– चौथऱ्यांची उंची : ४० फूट

– एकूण परिसर : सुमारे ३ एकर

– ठिकाण : मोशी- बोऱ्हाडेवाडी, पिंपरी-चिंचवड.

– सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा : १० फूट

– सरदार आणि मावळे एकूण १६ पुतळे : १० फूट

– पुतळ्याच्या आवारात ओपन एअर थिएटर

– प्रमुख प्रसंगांवर आधारित ब्राँझ म्यूरल्स

– शंभुराजांची गाथा ऐकण्यासाठी ४० बाय २० फूट एल.ई.डी. स्क्रीन

– चलचित्र आणि प्रकाश योजना

– शंभूराजांचे हॉलोग्राफिक प्रेझेंटेशन व्यवस्था

– रंगमंचाच्या दोन्ही बाजूस कंट्रोल रुम

– पुतळ्याचा सांगाडा एसएसमध्ये होणार.

– पुतळ्याच्या आतमध्ये लिफ्ट असेल. त्यामुळे मेंटनन्स करता येईल.

विशेष म्हणाजे, सुमारे १००० वर्षे पुतळा सुस्थितीत राहील, असा कामाचा दर्जा ठेवण्याचा संकल्प आहे.

‘पीएमपीएमएल’ला मिळाला आर्थिक ‘बुस्टर’…

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पीएमआरडीएच्या क्षेत्रात चालविल्या जातात या महामंडळाला जो तोटा सहन करावा लागतो त्यापोटी १८८ कोटी एकवेळ देण्यास यावेळीमान्यता देण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली पीएमपीएमएल अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ही कंपनी आर्थिक तोट्यात आहे. कंपनी चालवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आर्थिक भार उचलत आहे. मात्र, पीएमआरडीए, एमआयडीसी आणि जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये पीएमपीएमएल सेवा देत आहे. त्यामुळे या संस्थांनी पीएमपीएमएलचा आर्थिक भार उचलावा, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकरकमी १८८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button