पिंपरी चिंचवडचे अपर आयुक्त, उपायुक्तांची बदली; संजय शिंदे नवीन अपर आयुक्त
![Pimpri Chinchwad Additional Commissioner, Deputy Commissioner transferred; Sanjay Shinde New Additional Commissioner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/PCMC-Police-Commissioners-Office.jpg)
पिंपरी – भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पिंपरी चिंचवडचे अपर आयुक्त रामनाथ पोकळे तसेच उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची बदली झाली आहे. तर आयपीएस अधिकारी संजय शिंदे यांची पिंपरी चिंचवडच्या अपर आयुक्त पदी बदली झाली आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी (दि. 23) राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या पदावर भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची बढती व बदलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. त्यामध्ये पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर, पश्चिम विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुणे शहर, दक्षिण विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सुरुवातीपासून शहरात कार्यरत होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याकडे मुख्यालय तसेच गुन्हे शाखेची जबाबदारी होती. त्यांना बढती देण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे त्यांची बढतीने बदली करण्यात आली आहे.