पिंपळे निलख-विशालनगर येथे खोदकामाचा राडारोडा नदीपात्रात टाकण्याचा ‘‘प्रताप’’
राष्ट्रवादी (SP) चे शहराध्यक्ष तुषार कामठे इशारा : बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आंदोलन
![Pimple, Nilakh-Vishalnagar, digging, radar, riverbed, "Pratap"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/kamathe-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड : पिंपळे निलख, विशालनगर परिसरात मुळा नदीकाठी नदीसुधार प्रकल्प अंतर्गत करण्यात येत असलेल्या खोदकामाचा राडाराडा नदीपात्रात टाकला जात आहे यामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीपात्रात रडायला रोडा टाकणाऱ्या ठेकेदाराविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना तुषार कामठे यांनी निवेदन दिले आहे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मुळा नदीकाठी विशालनगर परिसरात नदीसुधार प्रकल्प अंतर्गत खोदकाम व काँक्रीटचे कामे सुरु करण्यात आली आहेत. या खोदकामाचा राडारोडा ठेकेदारामार्फत नदीच्या मुख्य पात्रात टाकला जात आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे नदीपात्रातील व काठावरील जैवविविधता धोक्यात आली आहे, भरावामुळे पावसाळ्यात पुरस्थितीचा रहिवासी भागाला मोठा फटका बसणार आहे तसेच पुराचे पाणी रहिवासी भागात शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पर्यावरणाचा ह्रास करून सुरु असलेला विकास त्वरित थांबवावा तसेच नदीमध्ये राडारोडा टाकणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी. तसेच पिंपळे निलख परिवारातील नागरिक व पर्यावरण प्रेमी नागरिक यांची बैठक घेऊन या प्रकल्पाची माहिती देण्यात यावी.मुळा नदीपात्रातील जैवविविधता धोक्यात आणणारा प्रकल्प थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– तुषार कामठे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पिंपरी-चिंचवड.