PCMC UPDATE: ‘डेस्टिनेशन मेमोर’ सोसायटीतील पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी!
महानगरपालिकेकडून तीन नवीन नळजोड मिळाले : भाजपा आमदार महेश लांडगे यांची प्रशासनाला सूचना
पिंपरी । प्रतिनिधी
पाटीलनगर- चिखली येथील ‘डेस्टिनेशन मेमोर’सोसायटीतील सदनिकाधारकांना भेडसावणारा पाणी प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून सोसायटीला एक इंच व्यासाचे तीन नवीन नळजोड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यासाठी सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती चिखली-मोशी-चऱ्होली- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली आहे.
‘डेस्टिनेशन मेमोर’ येथील २६६ सदनिकाधारकांना नियमितपणे पाणी प्रश्न भेडसावत आहे. याबाबत सोसायटीधारकांनी प्रशासनाने नवीन नळजोड मागीतले होते. मात्र, मिळत नव्हते. त्यामुळे सोसायटीला पाणी टँकरसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत होता. त्यामुळे सदनिकाधारक व सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्याकडे नवीन नळजोड मिळणेबाबत मागणी केली होती.
दरम्यान, संजीवन सांगळे यांनी महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. तसेच, आमदार महेश लांडगे यांना सदर प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर आमदार लांडगे यांनी सोसायटीला १ इंच व्यासाची ३ नवीन नळजोड उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनाला सूचना केली. सोसायटीमधील सदनिकाधारक आणि पाण्याची मागणी लक्षात घेता नवीन नळजोडमुळे पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
विकसक, महानगरपालिका प्रशासनाकडून पिळवणूक…
सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, आंद्रा, भामा आसखेडचे दोन्ही टप्प्यातील २६८ एमएलडी पाणी पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईपर्यंत संबंधित विकसकाने सोसायटीधारकांना स्व-खर्चाने पाणी पुरवठा करावा, असे हमीपत्र विकसकाने महानगरपालिकेला लिहून दिले आहे. पण, विकसक सोसायटीधारकांस पाणी पुरवठा करीत नाही.
महानगरपालिका प्रशासन भामा-आसखेड प्रकल्पाचे कारण सांगून नियमानुसार, प्रति १३ सदनिकांमागे १ इंच एक नळजोड या प्रमाणात नळजोड देत नाहीत. त्यामुळे सोसायटीधारकांची महापालिका प्रशासन व विकसक यांच्याकडून पिळवणूक सुरू आहे. याबाबत आम्ही महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत अनेकदा बैठक करुन विकसक महानगरपालिकेला लिहून दिलेल्या हमीपत्राप्रमाणे पाणी पुरवत नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विकसकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २०० प्रमाणे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली होती. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही होत नाही.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.