PCMC | गव्हाणे वस्ती येथील गणेश मंदिर जिर्णोद्धाराला प्रारंभ
नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे व सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ गव्हाणे यांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भोसरी परिसरातील गव्हाणे वस्ती येथे श्रद्धास्थान असलेल्या गणेश मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. फाल्गुन शके १९४८ गुरुवार दिनांक ५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
या उपक्रमासाठी परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नगरसेविका सोनाली गव्हाणे आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले दत्ताभाऊ गव्हाणे यांचा विशेष पुढाकार लाभला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम प्रत्यक्षात सुरू होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भोसरी परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी हे मंदिर जिर्णोद्धाराचे काम महत्वाचे ठरणार आहे. मंदिराचे सुशोभीकरण, परिसराचा विकास आणि भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा : अमेरिका भारताला नाचवतेय, मोदी कठपुतली; खासदार संजय राऊतांची टीका

कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्य मित्र मंडळ, आदिनाथनगर, सुखवाणी बाग जवळ, गव्हाणे वस्ती, भोसरी, पुणे ३९ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी साईराजे फ्रेंड्स सर्कल यांचे विशेष सौजन्य लाभले असून, भविष्यातही परिसराच्या सामाजिक व धार्मिक विकासासाठी असे उपक्रम राबवले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
गव्हाणे वस्तीतील गणेश मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेचे आणि एकतेचे केंद्र आहे. मंदिराच्या जिर्णोद्धारामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि परिसराच्या सांस्कृतिक परंपरेलाही बळ मिळेल. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हे काम दर्जेदार आणि लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– प्रा. सोनाली गव्हाणे, नगरसेविका.





