अमेरिका भारताला नाचवतेय, मोदी कठपुतली; खासदार संजय राऊतांची टीका

मुंबई | पश्चिम आशियातील आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे जगभरात तेल आणि गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी Strait of Hormuz सामुद्रधुनी इराणने बंद केल्यास जागतिक ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी Scott Bessent यांनी एक्स (X) वर पोस्ट करत भारताला रशियाकडून तेल आयात करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सूट दिल्याचे सांगितले. ही सूट सध्या समुद्रात असलेल्या जहाजांवर लागू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. रशियाकडून तेल घेण्यासाठी अमेरिका आपल्याला परवानगी देत आहे. अमेरिका भारताला नाचवत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतली झाले आहेत. अमेरिकेच्या सचिवांनी एक्सवर केलेली पोस्ट खेदजनक आहे. अशी परवानगी गुलाम राष्ट्रांना दिली जाते, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा : उन्हाचा पारा चढला! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा हाय अलर्ट

याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही एक्सवर पोस्ट करत टीका केली. ब्रिटिश गेल्यानंतर आपण स्वतंत्र झालो असे मानतो, पण आता अमेरिका ठरवणार भारताने रशियाकडून तेल किती दिवस विकत घ्यायचे? आधी ब्रिटिशांची परवानगी घ्यायचो, आता अमेरिकेची का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.





