PCMC : आयुक्तांनी सर्वसामान्य जनतेची घोर फसवणूक केली – अजित पवार
पिंपरी, (महा ई न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरासाठी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर एखादा नवीन प्रकल्प आणतील अशी अपेक्षा होती. मात्र, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणणे लांबच राहिले, त्यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावर पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांच्या हातात हात घालून खेळीमेळीने कामकाज करण्याचे धोरण राबविले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे झाली नाहीत. आयुक्तांनी सर्वसामान्य जनतेची घोर फसवणूक केली आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपच्या नाकर्तेपणाचे खापर महापालिका प्रशासनावर फोडले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची मोठ बांधण्यासाठी पवार यांनी पिंपरीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांची सोमवारी (दि. 1) चिंचवड येथील एखा खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतली. तत्पुर्वी, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, नेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी सभापती हिरानंद आसवानी, युवकाध्यक्ष विशाल वाकडकर आदी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, राज्यात महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे मुष्कील झाले आहे. कोणत्याच गोष्टीत सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारपासून ते महापालिकापर्यंत भाजप अपयशी ठरले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी सुध्दा भाजपचाच कित्ता गिरवायला सुरूवात केली आहे. सर्वसामान्यांच्या हिताचा एकही निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे शहरातले प्रलंबित प्रश्न जैसे थेच राहिले आहेत. त्यांच्या आपयशाबाबत सामान्य मानसाने बोलण्याचे धाडस केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे, अशा शब्दांत पवार यांनी खंत व्यक्त केली.