पिंपरी-चिंचवडच्या ‘या’ अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी पाल्यांचा प्रवेश घेवू नये – ज्योत्स्ना शिंदे
![Parents should not admit their children in 'Ya' unauthorized schools in Pimpri-Chinchwad - Jyotsna Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/school-.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
शासनाची कोणतीही परवानगी न घेता 6 शाळा अनधिकृतरित्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यास या शाळांमध्ये प्रवेश घेवू नये. या अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास होणा-या नुकसानाची जबाबदारी पालकांची राहील. तसेच या शाळांवर कायदेशीर कारवाईचा इशारा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिला आहे.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात महापालिका क्षेत्रातील सहा खासगी प्राथमिक शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत आहेत. यामध्ये कुदळवाडीतील इंग्रजी माध्यमाची ग्रँट मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल, भोसरीतील मास्टर केअर इंग्लिश स्कूल, कासारवाडीतील मराठी माध्यमाची ज्ञानराज प्राथमिक शाळा, चिखलीतील इंग्रजी माध्यमाची ज्ञानसागर इंग्लिश स्कूल, रहाटणीतील मॉर्डन पल्बिक स्कूल आणि सांगवीतील एम.एस. स्कुल फॉर किड्स या शाळांचा समावेश आहे.
या शाळांना यापूर्वी शाळा बंद करण्याबाबत नोटीसाही दिलेल्या होत्या. असे असतानाही या शाळा अनधिकृतरित्या चालू ठेवण्यात आलेल्या आहेत. शासनाची परवानगी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. अनाधिकृतपणे शाळा सुरु केल्यास किंवा चालू ठेवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील संबंधित पालकांनी आपल्या पाल्यास या अनाधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेवू नये. या अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास त्यांच्या पाल्याच्या होणा-या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार राहतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.