भोसरी प्रभाग क्र. ५ मध्ये ST स्मार्ट कार्ड (NCMC) नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
विधायक: भाजपा नगरसेविका कविता भोंगाळे-पाटील यांच्या पुढाकाराने उपक्रम

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्र. ५ मधील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरसेविका सौ. कविता भोंगाळे-पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ST स्मार्ट कार्ड (NCMC) नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विदर्भमित्र मंडळ, सिद्धेश्वर हायस्कूलजवळ, दिघी रोड, भोसरी येथे पार पडलेल्या या शिबिरात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्मार्ट कार्ड नोंदणी केली.
शिबिरात १३ वर्षांवरील महिला तसेच ६० वर्षांवरील पुरुषांची नोंदणी करण्यात आली. आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने नागरिकांची प्रक्रिया सुलभरीत्या पूर्ण करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार विहित शुल्क भरून अनेक लाभार्थ्यांनी ST स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली.
NCMC स्मार्ट कार्डमुळे ST बस, मेट्रो तसेच इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ एकाच कार्डाद्वारे घेता येणार असून, आधार व UDID लिंकिंगसह सुरक्षित डिजिटल व्यवहाराची सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा – मुसळधार पावसाने प्रभाग क्रमांक ११ ला तडाखा; नागरिकांच्या मदतीसाठी नगरसेविका योगिता नागरगोजे मैदानात

यावेळी बोलताना नगरसेविका सौ. कविता भोंगाळे-पाटील म्हणाल्या, “शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागू नये, तर त्या सुविधा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. भविष्यातही नागरिकांच्या हिताचे असे उपक्रम राबविण्यात येतील.”
या उपक्रमाला नगरसेवक सागर भैया गवळी, मंडल अध्यक्षा रोहिणी ताई मांढर, माजी मंडल अध्यक्ष रवींद्र नांदुरकर, प्रभाग अध्यक्षा स्वातीताई शिर्के, प्रभाग उपाध्यक्षा मनिषा ताई गंगणे, सुधाकर वसे, सांगळे गुरुजी तसेच कल्पना धाडसे यांनी भेट देऊन शिबिराच्या आयोजनास सहकार्य केले. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले.
प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. भविष्यातही अशा लोकाभिमुख शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना सहज आणि सुलभ पद्धतीने पोहोचाव्यात, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, तर त्यांच्या परिसरातच सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा आमचा उद्देश आहे. भविष्यातही नागरिकांच्या हिताचे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाला उपयोगी ठरणारे असे लोकाभिमुख उपक्रम राबवत राहू.”
– कविता भोंगाळे-पाटील, नगरसेविका , भाजपा, पिंपरी-चिंचवड.





