मुसळधार पावसाने प्रभाग क्रमांक ११ ला तडाखा; नागरिकांच्या मदतीसाठी नगरसेविका योगिता नागरगोजे मैदानात
घरकुल परिसरासह शरदनगर-नेवाळे वस्तीची पाहणी; प्रशासनाला तातडीने उपाययोजनांचे निर्देश

पिंपरी-चिंचवड । सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक ११ मधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक कुटुंबे घरातच अडकून पडली, तर शरदनगर-नेवाळे वस्ती परिसरातील अनेक कॉलनींमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांची भेट घेतली आणि पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधत तात्काळ मदतकार्य सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवीदादा लांडगे, अतिरिक्त आयुक्त बगाडे, अधिकारी मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, स्थापत्य व ड्रेनेज विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, घरकुल फेडरेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पूरग्रस्त भागाची संयुक्त पाहणी करण्यात आली. यावेळी साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करणे, बाधित नागरिकांना मदत उपलब्ध करून देणे आणि आवश्यक यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
हेही वाचा – आस्मानी संकटात भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी जपली माणुसकी!
नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी प्रत्येक बाधित कुटुंबाशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडणे टाळण्याचे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात उपस्थित राहून नागरिकांना धीर देत मदतकार्याला गती दिल्यामुळे नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या कार्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. “जनसेवा हीच काळाची गरज” या भूमिकेतून त्यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधत मदतकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी पुढाकार घेतला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“सततच्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक ११ मधील अनेक भागांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून प्रशासनाच्या समन्वयाने पाणी उपसा, मदतकार्य आणि आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कोणत्याही नागरिकाला संकटात एकटे सोडले जाणार नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि आवश्यक मदतीसाठी तात्काळ संपर्क साधा. या कठीण काळात आम्ही प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
— योगिता नागरगोजे, नगरसेविका, प्रभाग क्र. ११, पिंपरी-चिंचवड.





