ऑनलाईन नोंदणीमुळे शहरातील नागरिकांची होतेय फरफट, ‘ऑन द स्पॉट’लसीकरण करा – उपमहापौर हिराबाई घुले
!["Extend the term of the group organizing staff on the honorarium of the urban department". Deputy Mayor Hirabai Ghule's instruction to the administration "](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-04-07-at-3.01.47-PM-1.jpeg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु, कोविन अॅपवरील नोंदणीमुळे शहराबाहेरील अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे. परिणामी, शहरातील करदाते नागरिक लसीकरणापासून वंचित राहतात. त्यांना लस घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात, दूरच्या केंद्रावर जावे लागते. त्यासाठी लसीकण केंद्रांवर ‘ऑन द स्पॉट’ उपस्थित असलेल्या 100 टक्के नागरिकांचे कोविन अॅपवर नोंदणी करुन लसीकरण करावे, अशी सूचना उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी प्रशासनाला केली आहे.
याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात घुले यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांचे 100 टक्के ऑनलाईन नोंदणी पद्धतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. या ऑनलाईन नोंदणीमुळे शहरातील काहीच लोकांना लस मिळते. त्याउलट शहराबाहेरचे सर्वाधिक लोक लसीकरणासाठी असतात. पुण्यातील लोकही पिंपरीत येतात. शहरातील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण होणे आवश्यक आहे. शहरातील करदाते लसीकरणापासून वंचित राहत आहेत.
ऑनलाईन नोंदणीमुळे नागरिकांना लांबचे केंद्र मिळते. त्यातही दुपारपर्यंत रांगेत थांबूनही अनेकदा लस मिळत नाही. नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. वेळ वाया जातो आणि आर्थिक बुर्दंडही सहन करावा लागत आहे. ऑनलाईन नोंदणीमुळे स्थानिकांची फरफट होत आहे. महापालिका प्रशासनाने 45 वर्षांपुढील नागरिकांचे ‘ऑन द स्पॉट’ लसीकरण केले. मध्यंतरी 18 वर्षांपुढील काही नागरिकांचेही ऑन द स्पॉट’ लसीकरण केले जात होते. अचानक त्यामध्ये बदल केला आणि सर्व 100 टक्के ऑनलाईन पद्धतीने केले. महापालिका 45 वर्षांपुढील नागरिकांचे ‘ऑन द स्पॉट’ लसीकरण करु शकत होती. तर, आता का करु शकत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
शहरातील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचे महापालिकेचे कर्तव्य आहे. करदात्या नागरिकांचाही लस मिळण्याचा पहिला हक्क आहे. त्यामुळे लसीकण केंद्रांवर ‘ऑन द स्पॉट’ उपस्थित असलेल्या 100 टक्के नागरिकांचे कोविन अॅपवर नोंदणी करुन लसीकरण करावे. जेणेकरुन नागरिकांना घराजवळील केंद्रावर लस मिळेल. शहरातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल आणि शहर लवकर कोरोनामुक्त होईल, असे उपमहापौर घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.