एक कोटींचे दागिने महिलांना सुपूर्द; जागतिक महिला दिनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून भेट
पिंपरी – घरफोडी आणि सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनेतील एक कोटी ७ लाख ५३ हजार ८२० रुपयांचा ऐवज पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महिला तक्रारदारांकडे सुपूर्द केला. महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांनी आपण आजचा महिला दिन आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही, अशी भावना व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि.०८) झालेल्या कार्यक्रमास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, मंचक इप्पर, आनंद भोईटे, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर, गणेश बिरादार यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “स्त्री धनाच्या किमतीपेक्षा त्यात स्त्रीची भावना महत्वची असते. काही दिवसांपूर्वी देशात एक सर्व्हेक्षण झाले होते. त्यात ९० टक्के नागरिकांनी पोलिसांबाबतचा अनुभव वाईट असल्याचे सांगितले होते. ही पोलीस खात्यासाठी चांगली बातमी नव्हती. मात्र त्यानंतर त्या ९० टक्के नागरिकांना विचारले की गेल्या पाच वर्षात तुम्ही पोलीस ठाण्यात गेला होता का, तर सर्वच जणांनी नाही असे उत्तर दिले. पोलीसांबाबतचे मत पूर्वग्रह दुषित असतात.”
अपर आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, “अनेकदा लोकांकडून ऐकून किंवा सिरियलमध्ये पाहून पोलिसांबाबतचे मत तयार करतात. फार कमी टक्के नागरिक स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन अनुभव घेतात. पोलीस दलात सर्वचजण सारखे नसतात. प्रत्येक माणूस वेगळा असल्याने प्रत्येक वेळी नागरिकांना वेगळा अनुभव येईल. त्यामुळे पोलिसांना माझे सांगणे आहे की आपण केलेल्या चांगल्या कामाची दखल नागरिक नक्कीच घेतात.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहायक निरीक्षक दीपाली मरळे, उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे, पोलीस कर्मचारी सावंत, गाडे, भोसले आणि सुपेकर यांची महत्वाची भूमिका बजावली.