पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर ग्रेड सेपरेटरमध्ये उडी मारून एकाची आत्महत्या
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका भवनाच्या समोर पुणे-मुंबई महामार्गावर पुलावरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवारी, दि. 11) सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. त्या व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्ष आहे.
अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब बंडगर यांनी संत तुकाराम नगर, पिंपरी येथील अग्निशमन विभागाच्या मुख्यालयात येऊन माहिती दिली की, एक व्यक्ती महापालिका भवनासमोर आत्महत्या करीत आहे. त्यानुसार अग्निशमन विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान तोपर्यंत त्या व्यक्तीने पुणे-मुंबई महामार्गावर महापालिका भवनासमोरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.