स्कोडा कारमधून गुटखा विक्री : एकास अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Gutkha.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
स्कोडा कार मधून गुटखा विक्री केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने एकाला अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 1) सकाळी पावणे आठ वाजता थेरगाव येथे करण्यात आली.
हरिराम रत्नाराम विष्णोई (वय 35, रा. सुखसागर नगर, कोंढवा, पुणे. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सागर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याची विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरिराम याने त्याच्या स्कोडा कार (एम एच 12 / एफ पी 2106) मधून प्रतिबंधित गुटखा साठवून तो विक्री केला. मंगळवारी सकाळी तो थेरगाव येथे गुटखा विक्रीसाठी आला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत हरिराम याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक लाख 25 हजार 810 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा, रोख रक्कम आणि कार असा एकूण पाच लाख 19 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करत हरिराम याला अटक केली. हरिराम याने आरोपी सागर याला गुटखा विक्रीसाठी पुरवला असल्याने सागर विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.