एकदा विकलेली जमीन मालकाच्या परस्पर बनावट कागदपत्रांच्या आधारे पुन्हा विकली; वकिलावर गुन्हा दाखल
![Once sold the land was resold on the basis of the owner's mutually forged documents; File a case against the lawyer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/cheating-crime.jpg)
पिंपरी चिंचवड | एका वकिलाने त्याच्या मालकीची जमीन एका महिलेला विकली. त्यानंतर जमीन मालक महिलेच्या परस्पर तीच जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे दुस-या व्यक्तीला विकली. तसेच त्या जमिनीच्या बदल्यात दुस-या जमिनीचे खरेदीखत करून देतो असे अमिश दाखवून स्वतःच्या मालकीची नसलेल्या जमिनीची बनावट ताबा पावती महिलेला देऊन पावणे सात लाखांची फसवणूक केली.हा प्रकार सन 2004 ते 16 ऑगस्ट 2021 या कालावधीत वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडला. अॅड. सुनील शंकर वाल्हेकर (वय 52, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत आशा मेहरबानसिंग नेगी (वय 41, रा. पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाल्हेकर याने त्याच्या मालकीची सर्वे नंबर 83 हिस्सा नंबर 2/3/4/2 वाल्हेकरवाडी येथील तीन गुंठे मिळकत फिर्यादी यांना सहा लाख 75 हजरांना खरेदीखत करून विकत दिली. त्यानंतर आतापर्यंत फिर्यादी यांना त्या जागेचा प्रत्यक्ष ताबा दिला नाही.
तसेच फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ती मिळकत खोटे बनावट दस्तऐवज (खरेदीखत) बनवून दुसऱ्या व्यक्तीला विकली. फिर्यादी यांना विकत दिलेल्या मिळकती ऐवजी दुसरीकडील मिळकत खरेदीखत करून देतो असे आरोपीने अमिश दाखवले. आरोपीच्या मालकीची नसलेली मिळकत ही त्याची असल्याचे खोटे सांगून त्या मिळकतीची खोटी, बनावट ताबा पावती बनवली आणि फिर्यादी यांना दिली. त्या मिळकतीचे खरेदी करण्यासाठी पेपर नोटीस करण्यासाठी स्वतःचे संमतीपत्र देऊन फिर्यादी यांची सहा लाख 75 हजारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.