breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

भाजपाशी संपर्क नव्हे; माजी आमदार लांडे यांचे ‘पॉलिटिकल बॅलन्स’

चंद्रकांत पाटलांची भेट अन् मंथन शिबिरालाही उपस्थिती

पिंपरी-चिंचवडमधील राजकीय केंद्रबिंदू लांडेच्या हातात

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील ‘शरद पवार’ अशी ओळख असलेले माजी आमदार विलास लांडे यांनी नुकतेच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, विलास लांडे यांनी आपले राजकीय गुरू राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शिर्डीतील ‘मंथन’ शिबिरात सहभाग घेतला. यासोबतच राजकीय कौशल्य वापरुन भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. या भेटीचे गुपित ‘महाईन्यूज’ला अगदी स्पष्टपणे सांगितले.

शिरुर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मंथन शिबिराला काही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही. त्यातच पिंपरी-चिंचवडमधील एक बडा नेता भाजपाच्या प्रवेशाच्या तयारीत आहे. त्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याबाबत दावे-प्रतिदावे होवू लागले. राजकीय वर्तुळात लांडे समर्थकांसह राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती.

दरम्यान, ‘तेल लावलेला पेहलवान’ अशी ख्याती असलेल्या विलास लांडे यांनी अखेर चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमागचे कारण स्पष्ट केले. भोसरीसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे शिक्षण संस्थांचे जाळे उभारले आहे. त्याअंतर्गत डुडूळगाव येथे विधी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्याच्या मान्यतेसाठी लांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. तसेच, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून त्याबाबत पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे विलास लांडे राष्ट्रवादीला रामराम ठोकतील यात सुतराम शक्यता नाही. याउलट, ‘पॉलिटिकल बॅलन्स’ची भूमिका घेत लांडे यांनी राजकीय बुद्धीचातुर्याची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. यामुळे शहराच्या राजकीय परिघाचा केंद्रबिंदू भोसरी आणि भोसरीत विलास लांडे राहतील, असे संकेत आहेत.

… तर शिरुरसह पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला फटका
वास्तविक, २०१९ मध्ये विलास लांडे शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर संसदेत धडक देण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे यांना तिकीट देण्यात आले. आता डॉ. कोल्हे यांची भाजपाशी जवळीक वाढली आहे, अशी चर्चा आहे. किंबहुना, केंद्रातील महत्त्वाच्या मंत्र्यासंह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात डॉ. कोल्हे आहेत, याबाबतही राजकीय चर्चा होते. इतिहासात दृष्टीक्षेप टाकल्यास २००९ मध्येसुद्धा विलास लांडे यांनी राष्ट्रवादीकडून याच मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. गेल्या चार-पाच निवडणुकांचा अनुभव पाहाता शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये डॉ. अमोल कोल्हे आणि विलास लांडे यांच्या तोडीचा प्रभावी उमेदवार सध्यस्थितीला राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे डॉ. कोल्हे आणि लांडे यांनी वेगळा विचार केल्यास शिरुरसह पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा फटका बसेल, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे प्रस्तावित आहे. या खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण दिले जाते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यासंदर्भातील प्रशासकीय कारणास्तव उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. मी ‘मंथन’ शिबिराला उपस्थित होतो. कोणत्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

  • विलास लांडे, माजी आमदार, भोसरी.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button