Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी-चिंचवड रस्ता मृत्यूचा सापळा!

महामेट्रोच्या हलगर्जी कारभारावर माजी नगरसेवक विजय शिंदे यांचा हल्लाबोल

पिंपरी-चिंचवड :  शहरातील नागरिकांना आधुनिक सुविधांसाठी सुरू असलेली महामेट्रोची कामे सध्या जीवघेणी ठरत आहेत. विशेषतः निगडी ते चिंचवड मार्गावरील रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्डे, धूळधक्कड आणि वाहतूक कोंडीमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विजय शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत महामेट्रो आणि महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर थेट हल्लाबोल केला आहे.

शिंदे यांनी मेट्रो व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिंचवड स्टेशन ते निगडी आणि आकुर्डी परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी रस्त्यांची झालेली चाळण, खड्ड्यांचे साम्राज्य आणि नागरिकांच्या सुरक्षेचा अभाव पाहून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “मेट्रोच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. या प्रकाराला आळा घालण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

रस्त्याची दुरवस्था, अपघातांची वाढ

महामेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले असून, वेळेवर दुरुस्ती न केल्याने दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे प्राणघातक ठरत आहेत. अनेक नागरिक जखमी झाले असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रुग्णालये, शाळा, आणि औद्योगिक भागाशी जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने रोज हजारो वाहनांची वाहतूक होते. या सगळ्यामुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा –  ‘वित्तीय संस्थांमधील पैसे देण्याची कार्यवाही गतीने करून ठेवीदारांना दिलासा द्यावा’; गृह राज्यमंत्री योगेश कदम

वाहतूक कोंडीचा अडथळा

मेट्रोच्या कामांमुळे रस्त्याचा बहुतांश भाग अडवण्यात आला असून, उर्वरित अरुंद रस्त्यावरूनच वाहतूक चालते. यामुळे विशेषतः कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, नागरिक वेळेवर पोहोचू शकत नाहीत. पालखी सोहळ्याच्या दरम्यान देखील पावसामुळे चिखल व पाणी साचल्याने वारकऱ्यांची गैरसोय झाली.

तीव्र आंदोलनाचा इशारा

माजी नगरसेवक शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे. “ताबडतोब सर्व खड्डे बुजवा, कामाच्या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती फलकावर लावा, अन्यथा पुढील अपघातांना मेट्रो प्रशासनच जबाबदार असेल,” असा इशारा देत त्यांनी तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

अधिकाऱ्यांची उपस्थिती

या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता अभिमान भोसले, विपिन थोरमोडे, तर महामेट्रोचे प्रकल्प अधिकारी वाय. बी. सिंग, धनंजय योगानंद, श्री. कुलकर्णी, श्री. उपेंद्र सिंग, श्री. मिश्रा आदि उपस्थित होते.

निष्काळजीपणावर कठोर शब्दांत टीका

शिंदे म्हणाले, “विकासकामांना आमचा विरोध नाही, परंतु नागरिकांच्या जिवाशी खेळणारा निष्काळजी कारभार खपवून घेतला जाणार नाही. वेळेवर उपाययोजना न झाल्यास आम्ही नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू.” महामेट्रोच्या कामामुळे नागरिकांचे जीवन संकटात सापडले असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर याचे तीव्र परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा शिंदे यांनी दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button