मुळशी तालुक्यात फसवणुकीचा नवा पॅटर्न : नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत विकली 20 गुंठे जमीन

पिंपरी l प्रतिनिधी
नावातील साधर्म्य असल्याचा गैरफायदा घेऊन दोघांनी मुळशी तालुक्यातील 20 गुंठे जमीन एका व्यक्तीला विकली. हा प्रकार 15 डिसेंबर 2021 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीत घडला आहे. याबाबत जमीन विक्री करणा-यांसह, खरेदीदार, साक्षीदार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सलीम नूर मोहम्मद पीरजादा (वय 63, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी शनिवारी (दि. 19 फेब्रुवारी) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम नूर मोहम्मद पीरजादा, हसीना सलीम पीरजादा (दोघे रा. मुंढवा पुणे), भुरानी मोहम्मद रजाक इमदाद अली (रा. कोंढवा खुर्द, पुणे), एस एन शिंदे (रा. निगडी), आर आर कुले (रा. कोल्हेवाडी, पुणे), साळुंखे (रा. पिंपळे गुरव, पुणे), विक्रम भाट (रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथे सर्वे नंबर 42 / 12 येथे 20 गुंठे जमीन आहे. आरोपी सलीम आणि हसीना यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाशी असलेल्या साधर्म्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादी यांच्या 20 गुंठे जमिनीचे खोटे, बनावट दस्त केले. त्यावर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या बनावट सह्या करून ती जमीन आरोपी भुरानी यांना विकली.
या बनावट खरेदीखतावर आरोपी एस सन शिंदे यांनी साक्षीदार म्हणून तर आरोपी विक्रम साळुंखे व विक्रम भाट यांनी ते सलीम, हसीना आणि भुरानी यांना व्यक्तिशः ओळखत असल्याबाबत ओळख पटवून साह्य केल्या. आरोपी भुरानी यांनी बनावट दस्ताचा वापर करून फिर्यादीच्या मालकी क्षेत्रावर त्यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्यांच्या जागेत लावलेला बोर्ड काढून टाकून जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.





