राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दौरा; सत्ताधारी भाजपाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची रणनिती!
![NCP front formation: State President Jayant Patil's visit; Ruling BJP's strategy to 'correct program'!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/jayant-patil-ncp.jpg)
पिंपरी । अधिक दिवे
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाची सत्ता उलथवून लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात चार प्रमुख नेत्यांशी किमान अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेत भाजपाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची रणनिती आखली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद मोठी आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते (मास लीडर) पिंपरी-चिंचवड आणि पुण्यामध्ये तळ ठोकून राहणार आहेत. सत्तेच्या खूर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक बांधणी महत्त्वाची आहे. त्यासाठी काय करावे आणि काय टाळावे? याचे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बंद दाराआड चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाचे माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, नगरसेवक जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या सूचनेनंतर दुसऱ्याच दिवशी आमदार अण्णा बनसोडे कामाला लागले आहेत. प्रभाग क्रमांक १० मधील संभाजीनगर, शाहुनगरमधील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी स्थानिक नगरसेविका मंगला कदम यांच्या उपस्थितीत बैठक घेवून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आगामी काळात आमदार बनसोडे प्रभागनिहाय बैठका घेवून पक्षाची ताकद वाढवणार आहेत. त्याद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणारच… असा संकल्प राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सूचक इशारा…
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. या दौऱ्यात शहरप्रमुख सचिन भोसले यांनी शहरातील तीनही विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. राऊत यांनी आपल्या भाषणात माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या पराभवाची कारणमिमांसा करताना कथित गोळीबार प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला झालेली अटक आणि अन्य बाबींवर उपरोधिक टोला लगावला होता. तसेच, आगामी निवडणुकीत शिवसेनेचे ५० नगरसेवक निवडून येतील आणि महापौर शिवसेनेचा होईल, अशी ‘शिवगर्जना’ही केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीमागे राष्ट्रवादीचे नेते पक्षातील लोकांच्या पाठीशी आहेत आणि पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, असा सूचक इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांची अनुपस्थिती…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. पक्षाचे आमदार आणि माजी आमदार यांच्यासह काही पदाधिकारी यांची अप्रत्यक्ष बैठक झाली. मात्र, बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांना निमंत्रित केले नाही. याबाबत माहिती घेतली असता, वाघेरे-पाटील यांना या बैठकीबाबत कल्पनाच दिली नाही, असे निदर्शनास आले. वास्तविक, पक्षातील एका दिग्गज नेत्याला पक्षाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घ्यायची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.