भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामे द्या : माजी आमदार विलास लांडे
पिंपरी । प्रतिनिधी
भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत. सत्ताधारी भाजपाचा निषेध करावा. निवडणुका आता सहा महिन्यांवर आली आहे. राष्ट्रवादी सत्तेत येणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असा मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
सत्ताधारी भाजपाच्या स्थायी समितीतील लाच प्रकरणी सभापती नितीन लांडगे यांच्यासह स्वीय सहायक आणि चार जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राष्ट्रवादीने बुधवारी महापालिका भवनावर विशाल मोर्चा काढला.
अजित पवारांचा आदेशाची प्रतिक्षा…
शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, लाच लुचपत विभागाची कारवाई झाली त्यावेळीच राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे सदस्य दोषी असतील तर तात्काळ राजीनामे घेण्यात येतील. आता माजी आमदार विलास लांडे यांनीही मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्याक्षणी संबंधित सदस्यांचे राजीनामे घेण्यात येतील, अशी ग्वाही वाघेरे-पाटील यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराविरोधात पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जागरण गोंधळ आंदोलन सुरू केले आहे. थोड्या वेळात महापालिका भवनावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
निषेध मोर्चाला शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला आघाडी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका वैशाली घोडेकर, पौर्णिमा सोनवणे, नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, युवा नेते संदीप पवार, स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे, भाउसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष यश साने, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.
पोतदार, नंदीबैल, वासुदेव, गोंधळी यांच्या मदतीने भाजपाविरोधी वातावरण निर्मिती करीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष वेधले आहे.
सुरक्षारक्षकांशी कार्यकर्त्यांची हुज्जत…
दरम्यान, महापालिका सुरक्षारक्षकांनी राष्ट्रवादीचा विराट मोर्चा प्रवेशद्वारात रोखला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील प्रवेशद्वाला येवून आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्याची शक्यता आहे. सुरक्षा अधिकारी आंदोलनकर्त्यांना प्रवेश देत नसल्यामुळे काहीवेळी किरकोळ हुज्जत झाली.