तळवडे–रूपीनगर प्रभागात राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार; ‘लाडक्या बहिणीं’चा सक्रिय सहभाग
मिशन- PCMC : घरोघरी संवाद, विकासाचा अजेंडा आणि महिला शक्तीच्या जोरावर प्रचाराला नवी ऊर्जा

पिंपरी-चिंचवड : पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १२ तळवडे–रूपीनगरमध्ये पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात महिलांचा, विशेषतः ‘लाडक्या बहिणी’ंचा सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भालेकर, शरद भालेकर, सौ. सीमा धनंजय भालेकर आणि सौ. चारुलता सोनवणे यांच्या परिचय पत्रकांसह पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती देणारी पत्रके नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. घरोघरी भेटी देत थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येत असून, मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
हेही वाचा – ‘प्रभाग क्रमांक १० मध्ये शासकीय माध्यमिक व इंग्रजी शाळा उभारणार’; अनुराधाताई गोरखे

या प्रचाराला विशेष धार मिळाली आहे ती महिलांच्या सहभागामुळे. ‘लाडक्या बहिणी’ स्वतः मैदानात उतरून घराघरांत भेटी देत महिलांच्या समस्या, नागरी सुविधा, सुरक्षितता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांशी थेट चर्चा करत आहेत. विकासाच्या मुद्द्यांवर नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
हा प्रचार केवळ राजकीय स्वरूपापुरता मर्यादित न राहता विश्वास, आपुलकी आणि लोकसहभागाचा संदेश देणारा ठरत असल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येत आहे. महिलांच्या सक्रिय सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग मिळाल्याने प्रभागात पक्षाची पकड अधिक भक्कम होत असल्याचे चित्र आहे. महिला शक्तीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक १२ मध्ये आपला बालेकिल्ला कायम राखण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत.





